आपल्या देशाच्या कानाकोपऱ्यातून आणि आता विदेशांतूनही, अनेक तरुण तरुणी मुंबई या मायानगरीत रोज आपले नशीब आजमावयला थडकत असतात. चित्रनगरीची चमक त्यांना खुणावत असते परंतु त्यापाठी असलेल्या वेगळ्याच जगाबद्दल ते अनभिज्ञ असतात. काहीजण तर घरातून पळून आलेले असतात आणि त्यांच्यासाठी परतीचे सर्व मार्ग बंद झालेले असतात. चंदेरी दुनियेचा झगमगाट दिसत असतो परंतु तिथे पोहोचण्यासाठी लागणारी मेहनत आणि कष्ट शंभरपट असतात हे इथे आल्यावर कळते. त्यातच अशा लोकांना आपल्या जाळ्यात ओढून त्यांना लुटणारेही असतात. तसेच त्यांच्या अगतिकतेचा फायदा उचलणारेही खूप असतात. मनोरंजनसृष्टीत नाव आणि पैसा कमविण्यासाठी, कित्येकदा केवळ दोन वेळच्या जेवणासाठी, अनेकांना, खास करून तरुणींना, वेगळ्याच मार्गाकडे खेचलं जातं.
गेल्या काही दिवसांपासून राज कुंद्रा आणि त्याच्यावरील ‘पोर्नोग्राफी’ संदर्भातील आरोप याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. त्याला अटक झाली असून त्याला जामीनही नाकारण्यात आला आहे. महत्वाचे म्हणजे त्याच्या विरोधात अनेक तरुणींनी तक्रारी केल्या आहेत. आपल्या अश्लिल व्हिडीओज साठी ‘प्रसिद्ध’ असलेल्या पूनम पांडे आणि शर्लिन चोप्रा या छोट्या तारकांनीही कुंद्राविरोधात मोहीम उघडली असून त्यांच्या कथा माध्यमांतून फिरत आहेत. या दोघीही त्यांच्या ‘हॉट’ व्हिडीओजसाठी ओळखल्या जातात. राज कुंद्राच्या ‘चित्रपटांत’ काम केलेली गहना वशिष्ठ ही एकमेव अभिनेत्री त्याच्या बाजूने उभी आहे. शर्लिन आणि पूनमने राज कुंद्रा विरोधात फसवणुकीच्या तक्रारी दाखल केलेल्या आहेत आणि आता शर्लिन चोप्राने आता कुंद्रावर लैंगिक शोषणाचा आरोप केला आहे.
यासंदर्भात आम्ही शर्लिन चोप्रा ला काँटॅक्ट करण्याचा प्रयत्न केला परंतु तिने आमच्या कॉल्सना प्रतिसाद दिला नाही आणि आम्ही केलेल्या मेसेजेसनाही तिने प्रत्युत्तर दिले नाही. असेही कळले आहे की सध्या तिचे ‘पीआर’ कुठलीही एजन्सी बघत नाहीयेत तरीही प्रत्यक्षात तिला संपर्क करण्याचे प्रयत्न अजूनही सुरूच आहेत.
शर्लिन चोप्राला मुंबई पोलिसांच्या प्रॉपर्टी सेलने चौकशीसाठी पाचारण करण्यात आले असून तिने अटकपूर्व जामिनासाठी अर्ज केला होता परंतु तो कोर्टाकडून फेटाळण्यात आला आहे. आता हे प्रकरण किती पुढे जाते हे येणारा काळच सांगेल.
हेही वाचा - पोर्नोग्राफी प्रकरण : शर्लिन चोप्रा - पुनम पांडेला हायकोर्टाचा दिलासा, शर्लिन आज गुन्हे शाखेसमोर हजर होणार