मुंबई - बॉलिवूड अभिनेत्री शमिता शेट्टीच्या प्रवासाची सुरुवात २० वर्षापूर्वी धुमधडाक्यात झाली होता. आदित्य चोप्राच्या मल्टीस्टारर 'मोहब्बते' या चित्रपटात तिने इशिका ही भूमिका साकारली होती. त्यानंतर तिचे नाव देशातल्या घराघरात पोहोचले होते. त्यानंतर तिने 'फरेब' आणि 'जहर' यासारख्या चित्रपटातून भूमिका केल्या.
मात्र त्यानंतर प्रेक्षकांचे सातत्याने मनोरंजन करण्यात तिला यश आले नाही. मध्यंतरी तिने इंटिरीयर डिझायनर म्हणूनही काम करण्याचा प्रयत्न केला होता.
शमिता म्हणाली, ''मला विश्वास बसत नाही की २० वर्ष पूर्ण झाली. या क्षेत्रात आले तेव्हा मी किती लाजरी होते ते मला आठवते. वीस वर्ष एक मोठा काळ आहे. हा प्रवास चकित करणारा होता कारण भरपूर उतार चढाव मी पाहिले. दुर्दैवाने मी जास्त चित्रपट केले नाहीत. परंतु माझ्या जीवनातील अनेक पैलूंनी आणि स्थित्यंतरांनी मला एक मजबूत माणूस बनवले.''
होही वाचा - आलिया सिद्दीकीची ट्विटरवर एन्ट्री, म्हणते, ''चारित्र्यावर बोट ठेवाल तर सहन करणार नाही''
शमिता म्हणाली, "मी थोडी निवडक होते. जेव्हा तुम्ही चांगली सुरुवात करता तेव्हा तुम्हाला अशा गोष्टीसाठी तडजोड करायची गरज नसते. मी माझा वेळ घेतला. याशिवाय असे चित्रपटही आले की ज्यात मी केवळ सेटचा हिस्सा होते. मात्र, ते मी केले नाहीत.''
आता शमिताला काही नवीन करायचे आहे. यासाठी ती खूप प्रतीक्षा करीत आहे.
ती म्हणाली, "मी एका वेब सिरीजचे शूटिंग करणार होते. मात्र लॉकडाऊनमुळे लांबणीवर पडले. याशिवाय मी 'द टेनंट' या चित्रपटात काम केले आहे. हा चित्रपट लवकरच रिलीज होईल. सर्वकाही सुरळीत झाल्यानंतर पुन्हा एकदा सर्व काही सुरू करण्याची तयारी करीत आहे."