मुंबई: मॉडेल अभिनेत्री इशा गुप्ता REJCTX या वेब सिरीजमधून पहिल्यांदाच डिजीटल क्षेत्रात पदार्पण करीत आहे. अभासी जगामुळे नवीन पिढी वासना, लोभ आणि गुन्हेगारीवृत्तीकडे आकर्षित झाली असल्याचे इशा गुप्ताने म्हटले आहे.
"मला वाटते की आजकालच्या युवकाला जगाच्या वास्तविक अडचणींपेक्षा इतर गोष्टी महत्त्वाच्या वाटतात. मला सोशल मीडियावर जास्त लाईक का मिळत नाहीत? अशा प्रकारचे प्रॉब्लेम असतात. किंवा ‘त्याची कार माझ्यापेक्षा मोठी का आहे? ' अशा अवास्तव समस्या असतात. त्या व्यक्त करताना मत्सर, लोभ आणि चमकूगिरी जास्त असते. हे असे केवळ तरुणांचेच झालंय असे नाही तर सोशल मीडियावरील अनेकांचे असे झालंय. इंटरनेटने प्रत्येकाला प्रत्येक गोष्टीत प्रवेश दिला आहे! पण त्यांचे प्रश्न अनुभवातून बाहेर येण्याऐवजी ओव्हर एक्सपोजरमधून येत आहेत,'' असे मत इशा गुप्ताने व्यक्त केलंय.
तिने पुढे स्पष्ट करताना सांगितले, "ओव्हर एक्सपोजरमुळे यंगस्टर्सच्या लैंगिक गुन्हेगारीतही वाढ होत आहे. नवीन नातेसंबंध आणि शक्यतांचा शोध घेण्यास, डेटिंग आणि इतर साहस करण्याच्या विरोधात नाही. पण मी सोशल मीडियामुळे जास्तच वाढलेल्या लैंगिक शोषणाच्या विरोधात आहे. मी फक्त "वर्च्युअल वर्ल्डपेक्षा यंगस्टर्सने आपले आयुष्य खर्या जगात अधिक जगावे अशी अपेक्षा करते."
REJCTX ही वेब सिरीजमध्ये इशा गुप्ता सिंगापूरच्या पोलिसाची भूमिका साकारत आहे. या मालिकेचा दुसरा सिझन गोल्डी बहेल दिग्दर्शित करीत असून त्यांची ही निर्मिती आहे. ही एक नाट्यमय अॅक्शन थ्रीलर मालिका आहे. या मालिकेत मसी वली, अनिशा व्हिक्टर, आयुष खुराणा, रिद्धी खखर, प्रभनित सिंग, पूजा शेट्टी आणि तन्वी शिंदे यांच्या भूमिका आहेत. झी फाईव्हवर याचे प्रसारण होईल.