मुंबई - सुमधूर गळ्याची गायिका सावनी रविंद्रने मराठी, गुजराती तामिल, तेलुगु, मल्याळम, कन्नड आणि बंगाली अशा सात भारतीय भाषांमध्ये गाणी गाऊन बहुभाषिक रसिकांवर आपल्या सुरांची मोहिनी घातली आहे. यानंतर नुकतीच तिने गणेशोत्सवानिमित्त ‘वंदे गणपती’ ही संस्कृत बंदिश गायली. या गाण्याला सध्या संगीत रसिकांकडून भरभरून प्रतिसाद मिळत आहे.
संस्कृतमध्ये पदवी घेतलेल्या गायिका सावनी रविंद्रची बऱ्याच अवधीपासून संस्कृतमध्ये गाणे गाण्याची इच्छा होती. ही इच्छा ‘वंदे गणपती’ या गाण्यातून पूर्ण झाली आहे.
- " class="align-text-top noRightClick twitterSection" data="">
गायिका सावनी म्हणते, “वंदे गणपती ही हिंदुस्थानी शास्त्रीय संगीतातली बंदिश माझ्या आईच्या गुरू वीणा सदस्रबुध्दे ह्यांनी गायलेली आहे. त्यामुळे लहानपणापासून या बंदिशीसोबत एक ऋणानुबंध जुळला आहे. पंडित काशीनाथ बोडस यांची ही रचना सतत मनात रूंजी घालत राहिलीय. त्याच बंदिशीला कर्नाटक शास्त्रीय संगीताची किनार देण्याचं काम माझा मित्र आर. संजय याने केलंय. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर यंदाचा गणेशोत्सव साजरा करताना एक सकारात्मक मंगलमय गाणे रसिकांच्या भेटीला घेऊन आले आणि ते रसिकांनी उचलून धरले, याचा मला मनापासून आनंद आहे.”
सावनीच्या कर्नाटक शास्त्रीय संगीतात सजलेल्या सुरांना अभिनेत्री आणि नृत्यांगना अदिती द्रविडने भरतनाट्यम शैलीत साकारल्याने हे गाणे व्हिज्युअल ट्रिट झाले आहे. डॉ. आशिष धांडे निर्मित या गाण्याला व्हिज्युअल डायरी मोशन पिक्चर्सच्या श्रेयस शिंदे ह्यांनी चित्रीत केले आहे. टाइम्स म्युझिक स्पिरीच्युअलचे हे गाणे गणेश आराधनेत रसिकांना स्वरमयी साथ देत आहे.