मुंबई - 'स्टार प्रवाह'वरील ‘साथ दे तू मला’ या मालिकेच्या सेटवर नुकतंच एक जंगी सेलिब्रेशन पार पडलं. निमित्त्त होतं ते अभिनेत्री सविता प्रभुणे यांच्या वाढदिवसाचं. मालिकेतल्या सहकलाकारांनी आणि सेटवरच्या मंडळींनी केक कापून सविता ताईंचा वाढदिवस साजरा केला. मालिकेच्या टीमकडून मिळालेलं हे खास सरप्राईज पाहून सविता ताई भारावून गेल्या.
या मालिकेत आशुतोष कुलकर्णी सविता ताईंच्या मुलाची म्हणजेच समीर ही व्यक्तिरेखा साकारतोय. पडद्यावरची ही आई खऱ्या आयुष्यातही आम्हाला आईप्रमाणेच आहे, अशी भावना आशुतोषने व्यक्त केली. सविता ताई आम्हा सर्व कलाकारांवर भरभरुन प्रेम करतात. त्यांचा सल्ला आमच्या नेहमी कामी येतो. त्यांच्या एनर्जीचं आम्हा सर्वांनाच विशेष कौतुक वाटतं. शूटिंग लांबलं तरी त्यांच्या उत्साहामध्ये तसुभरही कमतरता नसते. ही गोष्ट त्यांच्याकडून शिकण्यासारखी आहे. त्यांना उदंड आणि निरोगी आयुष्य लाभो हीच इच्छा मी व्यक्त करतो, अशा शब्दांत आशुतोषने सविता ताईंना शुभेच्छा दिल्या.
खरं तर शूटिंगच्या निमित्ताने कलाकारांचे वाढदिवस सेटवर साजरे होण्यात नवीन काहीच नाही. पण सततच्या शूटिंगमुळे मालिकेचा सेट हेच कलाकाराचं दुसरं घर झालेलं असतं. अशावेळी आपल्यासोबत काम करणाऱ्या मंडळींनी आवर्जून आपला वाढदिवस सेटवर साजरा केला तर त्याचा वेगळाच आनंद होत असल्याचं सविता ताईंनी यावेळी सांगितले.