‘साईबाबा श्रद्धा आणि सबुरी' या अनोख्या आध्यात्मिक मालिकेला काही दिवसांतच प्रेक्षकांनी आपल्या पसंतीचा कौल दिला आहे. 'फक्त मराठी वाहिनी'ने त्याच्या पाठोपाठच ‘सप्तपदी मी रोज चालते’ ही दैनंदिन नवी कोरी मालिका प्रेक्षकांच्या भेटीसाठी आणली आहे. आजवर विविध आशयघन चित्रपट व कार्यक्रमांद्वारे रसिकांचं मनोरंजन करणारी 'फक्त मराठी वाहिनी’ आता दैनंदिन मालिकांच्या माध्यमातूनही प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेत आहे. याचे श्रेय जाते प्रसिद्ध दिग्दर्शिका स्वप्ना वाघमारे जोशी यांना, ज्या वाहिनीच्या प्रोजेक्ट हेड म्हणून कार्यभार पाहत आहेत. या मालिकेतील प्रत्येक कॅरेक्टर वास्तविक जीवनातील खरे खुरे रंग दाखवणारे असल्याने प्रत्येकाला ही मालिका आपल्याच घरातील कथा सांगणारी असल्यासारखे वाटेल.
‘सप्तपदी मी रोज चालते’ या मालिकेत अमृता आणि संजू यांची कहाणी पाहायला मिळणार आहे. या दोघांच्या माध्यमातून पवार आणि थोरात या दोन कुटुंबाची कथाही यात आहे. अमृताला आपल्या आईप्रमाणे कर्तबगार आणि वडिलांप्रमाणे समजूतदार पती हवा आहे. कालांतराने तिच्या आयुष्यात संजूची एंट्री होते, पण त्याला काहीही न करता फक्त ऐशोआरामात जीवन जगायचे आहे. अशी ही जोडी भविष्यात 'सप्तपदी' कशी चालणार या प्रश्नाचे उत्तर प्रेक्षकांना मालिकेच्या प्रत्येक भागागणिक मिळणार आहे. रिमोटपासून दूर ठेवणारे कथानक, कलाकारांचा सहजसुंदर अभिनय आणि दर्जेदार निर्मितीमूल्यांच्या आधारे 'सप्तपदी मी रोज चालते’ ही मालिका प्रेक्षकांच्या मनात आपले वेगळे स्थान निर्माण करण्यात यशस्वी होईल, असे मत 'सप्तपदी मी रोज चालते’चे दिग्दर्शक प्रवीण परब यांनी व्यक्त केले आहे.
‘फक्त मराठी वाहिनी’चे बिझनेस हेड श्याम मळेकर म्हणाले, की ‘फक्त मराठी वाहिनी’ने आजवर नेहमीच निखळ मनोरंजन देण्याचे काम केले आहे. हिच परंपरा जोपासत आम्ही दैनंदिन मालिकांच्या माध्यमातून रसिकांचं मनोरंजन करण्याची योजना आखली आहे. 'सप्तपदी मी रोज चालते’ ही पुढील मालिका प्रेक्षकांना नक्कीच काहीतरी नावीन्यपूर्ण देण्यात यशस्वी होईल. दैनंदिन मालिका तसेच विविध लोकप्रिय चित्रपटांच्या दिग्दर्शिका स्वप्ना वाघमारे या आमच्या या मालिकेच्या प्रोजेक्ट हेड म्हणून कार्यरत असल्याने मालिकेला त्यांच्या अनुभवाचा निश्चित फायदा होईल. आज इतर वाहिन्यांवर सुरू असलेल्या कौटुंबिक मालिकांच्या तुलनेत 'सप्तपदी'मध्ये काहीसे वेगळे कथानक पाहायला मिळणार असून, त्यातही अनेक कंगोरे असल्याने मालिकेत येणारे ट्विस्ट अँड टर्न्स प्रेक्षकांना खिळवून ठेवण्यासाठी पुरेसे ठरणारे आहेत.’
ऋणानुबंध, मानो या ना मानो, कॅप्टन हाऊस, कलश, कुटुंब, कहानी घर घर की, तीन बहुरानिया, देवयानी, संस्कार धरोहर अपनोंकी अशा ट्रेंड सेटर लोकप्रिय मालिकांसोबतच धमाधम्म, मितवा, फुगे, लाल इष्क, सविता दामोदर परांजपे, तुला कळणार नाही, माधुरी इत्यादी ग्लॅमरस सुपरहिट मराठी सिनेमांचं यशस्वी दिग्दर्शन करणाऱ्या स्वप्ना वाघमारे जोशी ‘सप्तपदी मी रोज चालते’ या मालिकेसाठी प्रोजेक्ट हेड म्हणून काम पहात आहेत. या मालिकेबाबत स्वप्ना वाघमारे जोशी म्हणाल्या की, सप्तपदी मी रोज चालते’च्या माध्यमातून एक आशयघन मालिका प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. आजच्या कुटुंब पद्धतीवर भाष्य करणाऱ्या या मालिकेत एक गुलाबी लोभासवाणी प्रेमकथाही पाहायला मिळणार आहे. एक नवी कोरी जोडी या मालिकेचे मुख्य आकर्षण ठरणार आहे. 'फक्त मराठी वाहिनी'चा मनोरंजनाचा वारसा जपणारी 'सप्तपदी मी रोज चालते’ प्रेक्षकांना नक्कीच आकर्षित करेल यात शंका नाही".
टेलिव्हिजन क्षेत्रातील आघाडीच्या ‘टेल अ टेल मीडिया प्रा. लि.’ या संस्थेच्या जितेंद्र गुप्ता आणि महेश तागडे यांनी 'फक्त मराठी वाहिनी'साठी या मालिकेची निर्मिती केली आहे. या मालिकेत तृप्ती देवरे, बिपीन सुर्वे, विजय मिश्रा, स्नेहा रायकर, अखिल लाले, संजना काळे, प्राप्ती बने, वंदना वाकनीस, विपुल साळुंखे, आरती शिंदे, अमित कल्याणकर, रुपाली गायके, रणजित रणदिवे, चेतन चावडा, श्रुती पारकर, हर्षदा कर्वे, पूजा यादव आदी कलाकारांच्या भूमिका आहेत.
सोमवार ते शुक्रवार दररोज रात्रौ ८:३० वाजता 'सप्तपदी मी रोज चालते’ ही मालिका प्रसारित होणार आहे 'फक्त मराठी वाहिनी'वर.