मुंबई - सुपरस्टार सलमान खानचा गाजलेला 'दबंग' चित्रपट आता एनिमेटेड सिरीजच्या स्वरुपात प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे.
या सिरीजमध्ये चुलबुल पांडे (सलमानने दबंगमध्ये साकारलेली इन्स्पेक्टरची व्यक्तीरेखा) याचा जीवन प्रवास दाखवण्यात आला आहे. यासोबतच 'दबंग' फ्रॅन्चाईजमधील गाजेल्या छेदी सिंह (सोनू सूद), रज्जो (सोनाक्षी सिन्हा) आणि प्रजापति (विनोद खन्ना) यांच्या व्यक्तीरेखाही एनिमेटेड अवतारात पाहायला मिळतील.
याबाबत माहिती देताना सलमानचा भाऊ आणि 'दबंग' सिरीजचा निर्माता अरबाज खानने सांगितले, ''दबंगचे सर्वात महात्त्वाचा युएसपी म्हणजे हा फॅमिली एन्टरटेनर शो आहे. म्हणून फ्रॅन्चाईजला पुढे नेण्यासाठी अॅनिमेशनच्या मार्गाने पुढे जायचे आहे. या माध्यमात कथा सांगण्याचे कमालीचे स्वातंत्र्य आहे. लांबलचक आयुष्यात छोट्या छोट्या गोष्टींकडेही लक्ष दिले जाऊ शकते, शिवाय याचे नरेशन सोपे आहे. चुलबुलची पर्सनॅलिटी खऱ्या आयुष्यात वेगळी आहे आणि अॅनिमेशनमध्ये त्याच्या अॅडव्हेन्चरची झलक दाखवली जाईल.''
अॅनिमेशन स्टुडिओ 'कॉसमॉस-माया'ला या आगामी एनिमेटेड प्रोजेक्टच्या निर्मितीचे अधिकार देण्यात आले आहेत.