हल्ली पुस्तकं जरी कमी वाचली जात असली तरी तंत्रज्ञानाच्या विकासामुळे ती ‘ऐकली’ जाताहेत. तरुणांना वाचनाची गोडी लागावी म्हणून प्रयत्नशील असणाऱ्यांमध्ये स्टोरीटेलच्या ऑडिओबुकचाही नंबर लागतो. त्यांच्यातर्फे अनेक भाषांमध्ये, त्यात मराठीही आहे, प्रसिद्ध पुस्तकं, प्रसिद्ध आणि लोकप्रिय व्यक्तींकडून रेकॉर्ड केली जातात जेणेकरून ‘वाचणाऱ्याचा’ इंटरेस्ट टिकून राहील. जगभरातील सर्वोत्कृष्ठ आणि दर्जेदार साहित्यकृती नव्या ऑडिओबुक तंत्रज्ञानात जगभरातील साहित्यप्रेमींसोबतच मराठी साहित्यरसिकांना स्टोरीटेलवर भुरळ घालत आहेत. प्रख्यात मराठी साहित्यिकांच्या गाजलेल्या अलौकिक कथा- कादंबऱ्या ऐकण्याची नामी संधी 'स्टोरीटेल मराठीवर' सातत्याने साहित्यप्रेमी श्रोत्यांना उपलब्ध होत आहेत.
आता मराठीमध्ये आयपीएस अधिकारी जयंत नाईकनवरे यांच्या 'आनंदयात्री : पोलिस अधिकाऱ्याची डायरी' ही थक्क करण्यारी अनुदिनी प्रसिद्ध अभिनेते सचिन खेडेकर यांच्या धीरगंभीर आवाजात 'स्टोरीटेलच्या ऑडिओबुकमध्ये ऐकायला मिळणार आहे.
एकीकडं जाती-धर्मावर आधारित व्यवस्थेला घरघर लागली असताना उत्क्रांतीच्या या घुसळणीतून एक कट्टर धर्म मात्र तयार झाला आहे, तो म्हणजे पोलीसधर्म ! 'इन्साफ' हा या धर्माचा देव, 'सुव्यवस्था' ही देवी, तर 'बंदोबस्त'ही त्याची आरती आहे. त्यांच्या टेन कमांडमेन्ट्स राज्यघटनेकडून आल्या. या पुस्तकात लेखक - जयंत नाईकनवरे (IPS) याच पोलीस धर्माबद्दल सांगत आहेत. त्यांच्या अनुभवातून आलेले हे लिखाण प्रसिद्ध अभिनेते सचिन खेडेकर यांच्या आवाजात ऑडिओबुकमध्ये स्टोरीटेलवर ऐकताना श्रोत्यांना नक्कीच आवडेल.
साहसी, थरारक काही लिहिणं हा या पुस्तकाचा हेतू नाही, हे लेखकाने प्रस्तावनेतच स्पष्ट केलं असलं तरी, त्यांच्या कारकिर्दीतल्या महत्त्वाच्या घटनांना ते जाता जाता स्पर्श करतात. वर्धा येथे असताना पोलिस अधिकाऱ्याची पोलिसांनीच केलेली हत्या, कल्याण परिसरातली संघटित गुन्हेगारी, मुंबई हल्ल्याची रात्र... या गोष्टींबद्दल त्यांनी लिहिलं आहे. २६ डिसेंबरच्या काळरात्रीनंतर पहाटे, त्यांच्या आयुष्यावर प्रभाव टाकणाऱ्या अशोक कामटे यांचा मृतदेह पहावा लागला, त्या क्षणाचं वर्णन त्यांनी अत्यंत कमी शब्दांत आणि इतकं नेमकं केलं आहे, की आपणही हेलावून जातो.
![sachin-khedekar-](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/mh-mum-ent-sachin-khedekar-nana-patekar-storytel-mhc10001_08062021215544_0806f_1623169544_977.jpeg)
यानिमित्तानं लोकप्रिय अभिनेते नाना पाटेकर यांनी या पुस्तकाबद्दलचा अनुभव कथन केला आहे. ते म्हणतात "कृष्णाची गीता वेगळी आणि प्रत्येक माणसाची गीता वेगळी, तशी तुमची ही गीता वेगळी आहे. कारण प्रत्येकाचं जगणं वेगळं आहे. काही अंशी ती माझ्या आयुष्याशी मिळतीजुळती आहे"
'स्टोरीटेल'द्वारे सर्व भारतीय भाषांमध्ये ऑडिओबुक्सची निर्मिती केली जात आहे आणि त्याला साहित्यप्रेमी वाचक श्रोत्या रसिकांचा अमाप प्रतिसाद मिळू लागला आहे. ही ऑडिओबुक्स कुठेही, कितीही वेळा व कधीही ऐकता येतात.
हेही वाचा - राष्ट्रीय पुरस्कारप्राप्त अभिनेता संचारी विजयचा अपघाती मृत्यू, ब्रेन डेड केले घोषित