मुंबई - बॉलिवूड अभिनेत्री दिया मिर्झा हिने काल (१ ऑगस्ट) तिच्या घटस्फोटाबाबत सोशल मीडियावर माहिती दिल्यानंतर बऱ्याच तर्कवितर्कांना उधाण आले आहे. साहिल सांगासोबत ५ वर्षे सुखी संसार केल्यानंतर अचानक दोघांमध्ये असे काय झाले, की त्यांनी घटस्फोटाचा निर्णय घेतला, असा प्रश्न चाहत्यांच्या मनात निर्माण झाला आहे. या दोघांच्या घटस्फोटाचे वृत्त समोर येत नाही, तोच बॉलिवूडच्या आणखी एका सेलिब्रिटीचे वेगळे होण्याची चर्चा सुरू झाली. त्यामुळे दियाच्या घटस्फोटामागे हेच तर कारण नाही ना, असा प्रश्न उपस्थित झाला आहे.
दिया आणि साहिल सांगाच्या घटस्फोटाचे कारण हे 'जजमेंटल है क्या'ची लेखिका कनिका धिल्लोन असल्याची चर्चा सध्या सोशल मीडियावर सुरू आहे. कनिका धिल्लोन आणि तिचे पती प्रकाश कोवेलामुडी यांनी देखील एकमेकांपासून वेगळे होण्याचा निर्णय घेतला आहे.
मात्र, कनिका आणि दिया या दोघींनीही हे वृत्त फेटाळले आहे. त्यांच्या ट्विटर अकाऊंटवरुन त्यांनी याबाबत स्पष्टीकरणही दिले आहे.
दिया आणि साहिल यांनी २०१४ साली लग्नगाठ बांधली होती. मात्र, ते दोघेही एकमेकांना ११ वर्षापासून ओळखत होते. लग्नाच्या ५ वर्षानंतर त्यांनी अखेर वेगळे होण्याचा निर्णय घेतला.
त्यांच्या घटस्फोटा मागील कारणाबाबत कोणीही तर्कवितर्क लावू नये, असे तिने तिच्या ट्विटमधुन म्हटले आहे. दोघांनीही मिळून हा निर्णय घेतल्याचे तिने स्पष्ट केले आहे.