मुंबई - 'तुझ्यात जीव रंगला' मालिकेतील तुमच्या आमच्या लाडक्या लाडूला मालिकेत एन्ट्री करून नुकतंच एक वर्ष पूर्ण झालं. या मालिकेतील लाडू याचं खरं नाव राजवीरसिंह रणजीत गायकवाड आहे. या मालिकेमुळे लाडूला चांगलीच लोकप्रियता मिळाली आहे. लाडू खऱ्या आयुष्यात कसा आहे. त्याला काय-काय आवडते हे जाणून घ्यायला त्याच्या चाहत्यांना प्रचंड आवडतं.
नुकताच लाडूचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या व्हिडिओत चक्क लाडू आपल्याला पारंपरिक पद्धतीने उसाचा रस काढताना दिसत आहे. लाडूचा हा व्हिडिओ पाहून त्याचे चाहते अवाक झाले आहेत. या छोट्याशा लाडूचे अभिनयासाठी नेहमीच कौतुक केले जाते. पण त्याचसोबत या चिमुकल्या लाडूला ऊसाचा रस काढण्यासारखे कठीण कामदेखील येते हे पाहून त्याचे चाहते चांगलेच खूश झाले आहेत.
लाडूच्या मालिकेतील प्रवासाला १ वर्ष पूर्ण झालं आणि याच निमित्ताने 'तुझ्यात जीव रंगला' या मालिकेच्या सेटवर केक कापून आनंद साजरा करण्यात आला. या एका वर्षात लाडूवर प्रेक्षकांनी भरभरून प्रेम केलं. लाडू हा चाहत्यांशिवाय मालिकेतील सगळ्या कलाकारांचादेखील लाडका आहे.