फिल्म आणि टीव्ही इंडस्ट्रीसह अनेकांना #MeToo मिटू चळवळीने धक्का दिला होता. आजही ही चळवळ थांबली आहे असे वाटत असतानाच अभिनेत्री स्वाती भदवे हिने प्रॉडक्शन कंट्रोलरवर तसाच आरोप केला आहे. 'सहकुटुंब सहपरिवार' या टीव्ही मालिकेचा प्रॉडक्शन कंट्रोलर स्वप्नील लोखंडेनं आपल्याकडे शरीर सुखाची मागणी केली होती असा धक्कादायक खुलासा स्वातीने केल्यामुळे टीव्ही इंडस्ट्रीत खळबळ उडाली आहे.
'सहकुटुंब सहपरिवार' या टीव्ही मालिकेतील ज्येष्ठ अभिनेत्री अन्नपूर्णा विठ्ठल यांनी या मालिकेचे निर्माते व सहकलाकारांवर मानसिक छळ केल्याचा गंभीर आरोप काही दिवसापूर्वी केला होता. त्यानंतर स्वाती भदवेनेही मालिकेच्या प्रॉडक्शन कंट्रोलर विरोधात गोरेगाव पोलिस ठाण्यात एफआयआर दाखल करण्यात आली आहे. त्यानंतर प्रॉडक्शन कंट्रोलर स्वप्नील लोखंडे याला अटक करण्यात आली आहे.
खरंतर हे प्रकरण जुने असल्याचे समजते. आत्ताच का तक्रार केली असे विचारले असता अभिनेत्री अन्नपूर्णा विठ्ठल यांनी तक्रार केल्यानंतर आपल्याला बळ मिळाल्याचे स्वातीने मीडियाशी बोलताना सांगितले आहे.
'सहकुटुंब सहपरिवार' या मालिकेतील अभिनेत्री नंदिता पाटकरची बॉडी डबल म्हणून स्वाती भदवे काम करीत असते. ज्यावेळी नंदिता सेटवर हजर नसते किंवा तिच्या जागी दुसरी व्यक्ती डमी म्हणून ठेवून शुटिंग करायचे असते त्या जागी स्वाती काम करीत असते.
मीडियाशी बोलताना स्वाती म्हणाली की, स्वप्नील लोखंडेनं माझा फोन नंबर मागितला. यानंतर पुण्यात काम करणार का? असे विचारले. मी हो म्हटल्यानंतर त्याने मोबदला म्हणून शरीर सुखाची मागणी केल्याचे ती म्हणाली. आपल्यासाठी हा मोठा धक्का होता असेही ती म्हणाली.
स्वाती भदवेने आजवर अनेक हिंदी व मराठी मालिकांमध्ये काम केलं आहे. फुलाला सुगंध मातीचा, जिजामाता अशा अनेक मालिकांशिवाय क्राईम पेट्रोल या हिंदी मालिकेतही तिने काम केलं आहे.
हेही वाचा - कॅटरिना विकीच्या शाही विवाहात पाहुण्यांसाठी एसओपी जारी