मुंबई - 'झी युवा' ही मराठी वाहिनी प्रेक्षकांसाठी नेहमी निरनिराळ्या धाटणीच्या मालिका घेऊन येते. हृता दुर्गुळे आणि यशोमन आपटे यांच्या मुख्य भूमिका असलेली 'फुलपाखरू' ही मालिका, अशाच लोकप्रिय मालिकांपैकीच एक आहे. मानस आणि वैदेहीचं कॉलेज जीवनातील प्रेम, पुढे त्यांचं झालेलं लग्न आणि त्यांची मुलगी माही, अशा सगळ्यांवरच प्रेक्षकांनी भरभरून प्रेम केलं. या प्रेमाच्या जोरावरच आज 'फुलपाखरू' या मालिकेचे ६०० भाग पूर्ण झाले आहेत. मालिकेच्या संपूर्ण टीमने, सेटवर केक कापून हे यश साजरं केलं. यावेळी सगळ्यांच्याच चेहऱ्यावर आनंद दिसत होता.
हृता आणि यशोमन या जोडीचा एक वेगळा चाहतावर्ग निर्माण झाला आहे. त्यामुळे मालिकेला नेहमीच छान प्रतिसाद मिळतो. एक आगळीवेगळी प्रेमकहाणी असणाऱ्या या मालिकेने यशाचे हे नवे शिखर गाठले आहे. पडद्यावर दिसणाऱ्या सर्व कलाकारांनी पडद्यामागे मेहनत घेणाऱ्या सर्व टीमचे मनापासून आभार मानले. भूमिकेचे नावही आमची ओळख बनून जाते, याचा अधिक आनंद होतो, असं सगळ्यांनीच आवर्जून सांगितलं. यापुढेही मालिका प्रेक्षकांना असाच आनंद देत राहील याची खात्री असल्याचे अभिनेत्री हृता दुर्गुळेने म्हटलं.
"मालिकेचे ६०० भाग पूर्ण होणं, ही आमच्या सगळ्यांसाठीच एक आनंदाची बाब आहे. पण, आमच्यावर प्रेम करणाऱ्या प्रेक्षकवर्गाशिवाय ही गोष्ट शक्य नव्हती. म्हणूनच, मी या चाहत्यांचे मनापासून आभार मानते. प्रेक्षकांनी दाखवलले प्रेम, विश्वास तसाच राहावा यासाठी उत्तम काम करत राहणं हे खरंच कठीण असतं. ते आम्ही करू शकलो म्हणून आज हे यश पाहायला मिळते आहे. त्याचा नक्कीच खूप आनंद वाटतो आहे, असं या मालिकेत मुख्य भूमिकेत दिसणाऱ्या हृता दुर्गुळे, यशोमन आपटे आणि पौर्णिमा तळवळकर यांनी सांगितलं.