पुणे : जिल्ह्यातील कोविड संसर्गाची परिस्थिती नियंत्रणात असल्याने येत्या 1 डिसेंबरपासून कोविड मार्गदर्शक सूचनांचे पालन करून सांस्कृतिक कार्यक्रमांना परवानगी देण्यात यावी आणि चित्रपटगृह तसेच नाट्यगृहात 100 टक्के प्रेक्षक क्षमतेलाही परवानगी देण्यात यावी, असे निर्देश उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिले आहेत.
विभागीय आयुक्त कार्यालयात झालेल्या कोविड आढावा बैठकीत ते बोलत होते. बैठकीस खासदार गिरीष बापट, महापौर मुरलीधर मोहोळ, जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा निर्मला पानसरे, विभागीय आयुक्त सौरभ राव, जिल्हाधिकारी डॉ.राजेश देशमुख आदी उपस्थित होते.
सांस्कृतिक कार्यक्रमांनाही परवानगी
राज्यातील कोविड परिस्थीती नियंत्रणात असल्याने 1 डिसेंबरपासून शाळा सुरू करण्यात येत आहेत. त्याप्रमाणे सांस्कृतिक कार्यक्रमांनाही परवानगी देण्यात येईल. मात्र कोविडचा धोका अद्यापही पूर्णपणे टळला नसल्याने नागरिकांना मास्क घालणे आणि कोविड नियमांचे पालन करणे बंधनकारक असेल. जगातील इतर देशात पसरणाऱ्या नव्या कोविड व्हेरियंटच्या पार्श्वभूमीवर विशेष दक्षता घेण्यात यावी असं यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले.

पुणे विमानतळावर तपासणी करण्यात येऊ नये
कोविड लशीच्या दोन मात्रा घेतलेल्यांनाच विमान प्रवासाची अनुमती असल्याने देशांतर्गत प्रवास करणाऱ्या प्रवाशांची पुणे विमानतळावर तपासणी करण्यात येऊ नये. नवा व्हेरीयंट आढळलेल्या देशातून येणाऱ्या प्रवाशांबाबत केंद्र सरकारच्या सूचनेनुसार निर्णय घेण्यात येईल. नुकतेच झालेले सण-उत्सव आणि नव्या व्हेरियंटचा धोका पाहता जम्बो कोविड हॉस्पिटलबाबत डिसेंबरअखेर निर्णय घेण्यात येईल, अस देखील यावेळी अजित पवार यांनी सांगितले. लस न घेणाऱ्या नागरिकांच्या प्रबोधनावर भर द्यावा. जिल्ह्यातील सर्व शासकीय रुग्णालयातील कर्मचाऱ्यांना आगीच्या घटना टाळण्यासाठी व आपत्कालीन परिस्थीत तातडीने कार्यवाही करण्यासाठी आवश्यक प्रशिक्षण द्यावे, असेहीपवार म्हणाले.
लसीकरणात वाढ झाल्याने रुग्णसंख्या व मृत्यूच्या संख्येत घट
जिल्ह्याने कोविड लसीकरणाचा 1 कोटी 30 लक्षचा टप्पा पार केला असून लसीरणात पुणे जिल्हा राज्यात दुसऱ्या क्रमांकावर आहे. ‘हर घर दस्तक’ मोहिमेअंतर्गत जिल्ह्यातील 431 गावात 100 टक्के पहिल्या मात्रेच लसीकरण पूर्ण झाले आहे. लसीकरणात वाढ झाल्याने रुग्णसंख्या व मृत्यूच्या संख्येत घट झालेली आहे. 97 टक्के नागरिकांना लशीची पहिली मात्रा तर 62 टक्के नागरिकांना दुसरी मात्रा देण्यात आली आहे. जिल्ह्याचा पॉझिटीव्हीटी दर 1.6 पर्यंत कमी झाला आहे, अशी माहिती यावेळी विभागीय आयुक्तांनी दिली.
हेही वाचा - बॉलिवूडची क्वीन दीपिका पदुकोणने शकुन बत्राच्या चित्रपटासाठी डबिंग केले सुरू!