मुंबई - चित्रपटसृष्टीतील सर्वात मानाचा पुरस्कार म्हणून समजल्या जाणारा ऑस्कर पुरस्कार मोठ्या थाटामाटात पार पडला. या ऑस्कर पुरस्कारावर भारतात तयार झालेल्या लघू माहितीपटाने नाव कोरले आहे. 'पीरियड एंड ऑफ सेंटेंस', असे या माहितीपटाचे नाव आहे. ऑस्कर पुरस्काराच्या घोषणेनंतर भारतात आनंदाची लकेर उमटली आहे.
'पीरियड एंड ऑफ सेंटेंस' हा माहितीपट उत्तर प्रदेशातील हापुड जिल्ह्यातील काठी या खेडेगावात राहणाऱ्या स्नेहा नावाच्या युवतीवर तयार करण्यात आला आहे. निर्माती गुनीत मोंगा यांनी या माहितीपटाची निर्मिती केली आहे. त्यांनी 'द लंचबॉक्स', 'मसान', 'जुबान', यांसारख्या बॉलिवूड चित्रपटांची देखील निर्मिती केली आहे.
यावर्षीच्या ऑस्कर सोहळ्यात तब्बल ९ माहितीपटांना नामांकन मिळाले होते. त्यापैकी 'पीरियड एंड ऑफ सेंटेंस' या माहितीपटाने ऑस्करच्या शर्यतीत बाजी मारली. मासिक पाळीकडे पाहण्याचा दृष्टीकोन माहितीपटात अधोरेखित करण्यात आला आहे. तसेच, महिलांमध्ये जागरुकता निर्माण करण्याचा प्रयत्नही या माहितीपटातून केला आहे.
ऑस्करच्या घोषणेनंतर निर्माती गुनित मोंगा यांनी ट्विटरवर ट्विट करत आपला आनंद व्यक्त केला.