मुंबई - शहरातील प्रत्येक सिनेरसिकाच्या हृदयात एक विशेष स्थान असलेले, आणि मुंबईच्या सुवर्णकाळाचा साक्षीदार असलेले दादरचे चित्रा चित्रपटगृह अखेर बंद करण्याचा निर्णय या चित्रपगृहाच्या मालकाने घेतला आहे. शुक्रवारी टायगर श्रॉफच्या स्टुडंट ऑफ द ईअर २ या सिनेमाचा शो या चित्रपटगृहातील अखेरचा शो ठरला.
१९३२ साली पत्र्यांच्या शेडमध्ये सुरू झालेल्या या थिएटरमध्ये सुरुवातीला मुकपटाचे शोज दाखवले जायचे. १९३८ साली या चित्रपटगृहाची इमारत बांधून पूर्ण झाली. तेव्हापासून हे चित्रपटगृह रसिकांच्या सेवेत होते ते कालपर्यंत. मात्र बदलत्या काळात अनेक गोष्टी बदलत गेल्या. सिंगल स्क्रीन थिएटर्सचा जमाना जाऊन मल्टिप्लेक्स सुरू झाले. दुसरीकडे टीव्ही आणि ऑनलाईन वेबसीरिजच्या वाढत्या प्रभावात प्रेक्षकांची चित्रपटगृहात येऊन सिनेमे पाहाण्याची संख्या कमी व्हायला लागली. त्यातच विजेचे वाढते दर, कर्मचाऱ्यांचे पगार, सरकारी कर हे सगळं गणित दिवसेंदिवस परवडेनासे झाल्याने या चित्रपटगृहाचे मालक दारा मेहेता यांनी या चित्रपटगृहाबाहेरच 'द एंड'चा बोर्ड लावायचा निर्णय घेतला.
हिंदी सिनेसृष्टीचा सुवर्णकाळ अनुभवलेली ही वास्तू आज आपलं पुढे काय होणार या विवंचनेत उभी आहे. एकेकाळी राज कपूरचा सिनेमा रोक्सीत आणि दिलीप कुमारचा सिनेमा चित्रामध्ये असं समीकरण होतं. आवारा, दिदार, मदर इंडिया, बाबूल, नया दौर, जंगली, दिल दे के देखो, असे एकाहून एक सरस सिनेमे या चित्रपटगृहात सिल्व्हर आणि गोल्डन ज्युबिली झाल्याशिवाय खाली उतरले नाहीत. ९० च्या दशकात या चित्रपटगृहाला घरघर लागली असं वाटत असतानाच 'माहेरची साडी' या सिनेमाने या चित्रपटगृहाला नवी उभारी दिली. सलग ७० आठवडे म्हणजेच जवळपास वर्षभर हा सिनेमा या चित्रपटगृहात चालला.
५५० लोकं बसतील एवढी या चित्रपटगृहाची क्षमता होती. मराठी बहुल भगात हे चित्रपटगृह असल्याने मराठी सिनेमाचं ते हक्काचं माहेरघर होतं. चित्रा बंद पडल्याने चांगले सिनेमे रिलीज करायचे कुठे हा यक्षप्रश्न मराठी सिनेसृष्टीपुढे आ वासून उभा आहे. हे चित्रपटगृह बंद झाल्याने आता दादर परिसरातील शारदा आणि हिंदमाता, अशा एकपडदा बंद पडलेल्या चित्रपटगृहांच्या यादीत नवं नाव दाखल झालं ते म्हणजे चित्रा.