मुंबई - मिर्झापूरच्या दुसर्या सिझनसाठी लोकांचा उत्साह शिगेला पोहोचला आहे. अशावेळी अमेझॉन प्राइम व्हिडिओने मिर्झापूरचे कलाकार आणि उत्तर प्रदेशातील रहिवासी यांना जवळ आणण्याचा नवा मार्ग शोधलाय. बनारस, आग्रा, गाझियाबाद, बरेली, प्रयागराज, मेरठ, लखनऊ आणि कानपूर या शहरांच्या आसपास राहणाऱ्या लोकांना मिर्झापूरच्या सिंहसनावर कोणाला बसवायचे हे ठरवण्याची संधी मिळणार आहे.
मिर्झापूर मालिकेतील लोकप्रिय व्यक्तीरेखा कालीन भैया (पंकज त्रिपाठी), गुड्डू पंडित (अली फजल) आणि मुन्ना भैया ( दिव्येंदु) यांची मोठमोठी कटआऊट्स शहरांमध्ये झळकणार आहेत. त्यामुळे एखाद्या वेब सिरीजचे अशा प्रकारे प्रमोशन करण्याची ही पहिलीच वेळ आहे.
या कट-आउटवर क्यूआर कोड समाविष्ट केले आहेत. कोड स्कॅन करून, मिर्झापूरच्या सिंहासनावर कोणती व्यक्तीरेखा बसायला हवी हे चाहते ठरवू शकणार आहेत. लोक आपल्या मोबाईलच्या वापराने हा कोड स्कॅन करतील आणि आपल्या आवडत्या व्यक्तीला मतदान करु शकतील. हे मतदान १५ दिवस चालेल.
'मिर्झापूर 2' मध्ये पंकज त्रिपाठी, अली फजल, दिव्येंदु, श्वेता त्रिपाठी, हर्षिता गौर, रसिका दुगल, अमित सियाल, विजय वर्मा, शिभा चड्ढा, राजेश तैलंग आणि कुलभूषण खरबंदा मुख्य भूमिका साकारणार आहेत. या शोची निर्मिती पुनीत कृष्णा निर्मित एक्सेल मीडिया अँड एंटरटेनमेंट यांनी केली असून गुरमीतसिंग आणि मिहीर देसाई यांनी दिग्दर्शन केले आहे.
जवळपास दोन वर्षांच्या प्रदीर्घ प्रतीक्षेनंतर अमेझॉन २३ ऑक्टोबर २०२० रोजी 'मिर्झापूर २' मालिका प्रदर्शित होणार आहे.
२३ ऑक्टोबर रोजी जगभरातील २०० हून अधिक देशांमध्ये अमेझॉन प्राइम व्हिडिओवर ही वेब सीरिज रिलीज होईल.