समाजासाठी जेवढे जमेल तेवढे करा आणि ते केल्यानंतर केलेले काम विसरून जा. दुसऱ्या कामाला लागा मात्र केलेल्या कामाचा तमाशा करू नका, असे आवाहन प्रसिद्ध सिनेअभिनेता नाना पाटेकर यांनी केले. भाईश्री परिवार आणि नाम फाउंडेशन यांच्यावतीने आज अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर आयोजित करण्यात आलेल्या सामूहिक विवाह सोहळ्यात ते बोलत होते .
यावेळी व्यासपीठावर अभिनेता मकरंद अनासपुरे, हरि भक्त परायण शेष महाराज गोंदिकर, भाईश्री परिवाराचे रमेश भाई पटेल, भावेश पटेल, आदींची उपस्थिती होती.
उपस्थितांना आवाहन करतानाच नाना यांनी कानमंत्रही दिले. अशा प्रकारचे सामाजिक उपक्रम राबविणे म्हणजे आपण काही कोणावर उपकार करत नाहीत, जी गोष्ट आपल्याकडे आहे आणि समोरच्याकडे नाही ही त्याला देणे ही आपली जबाबदारीच आहे. आणि ती करतच राहिली पाहिजे असे सांगून मला मुलगी नाही. मात्र आज या मुलींचे कन्यादान करताना मला आनंद होत आहे, असेही नाना म्हणाले. दरम्यान, माझा मुलगा मल्हार याचाही मी सामूहिक लग्न सोहळ्यामध्येच विवाह करण्याचा प्रयत्न करील असे मनोगतही त्यांनी व्यक्त केले.
प्रसिद्ध अभिनेता मकरंद अनासपुरे यांनीही ही थोडक्यात आपले मनोगत व्यक्त केले. त्यांनी त्यांच्या खास मिस्कील भाषेमध्ये नवरदेवाचा समाचार घेताना उपस्थितांमध्ये हास्य पिकवले.
आज पार पडलेल्या या सामूहिक विवाह सोहळ्यामध्ये 48 विवाह सोहळे पार पडले. प्रत्येक जोडप्याला गृह उपयोगी साहित्य देण्यात आले. तसेच प्रत्येक जोडप्याचे पालकत्व ही समाजातील दानशूर व्यक्तींनी घेतले होते. राष्ट्रीय हिंदी विद्यालय पासून नवरदेवाची वरात श्रीमती दांनकुवर महाविद्यालयापर्यंत वाजत गाजत नेण्यात आली. महाविद्यालयाच्या भव्य पटांगणावर एकाच व्यासपीठावर आणि मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये या वधू-वरांचे विवाह संपन्न झाले.