मुंबई - 'बिग बॉस मराठी'च्या पहिल्या सीझनच्या यशानंतर आता या रिअॅलिटी शोचा दुसरा सीझन लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. पहिल्या सीझन प्रमाणेच दुसऱ्या सीझनचं होस्टींग महेश मांजरेकरच करणार आहेत. मात्र, पहिल्या सीझनच्या वेळी मनात असलेली धाकधूक कमी झाल्याने यावेळी या शोची कोणतीच पूर्वतयारी करणार नसल्याचं मांजरेकर यांनी सांगितलं आहे.
पहिल्या सीझनमध्ये स्पर्धक जसे वागत गेले तसाच मी वागत गेलो, असं त्यानी सांगितलं. या शोची खासियत तो कसा घडत जातो त्यातच आहे. त्यामुळेच यावेळी घर कसं आहे, घरात नक्की कोण कोण असेल आणि त्यांना मी कसा हाताळणार याचे काहीच ठोकताळे तयार केले नसल्याचं त्यांनी 'ई टीव्ही भारत'शी बोलताना सांगितलं.
'बिग बॉस'च्या दुसऱ्या सीझनचे प्रोमो नीट पाहिले तर यावेळी सेलिब्रिटी स्पर्धकांसोबतच काही अतरंगी कॉमन मॅनही घरात असतील असं वाटतं आहे. मात्र प्रेक्षकांचं पुरेपुर मनोरंजन करतील असे १५ जण या घरात दिसतील असं आश्वासन कलर्स मराठीचे बिझनेस हेड निखिल साने यांनी दिलं आहे. शोच्या फॉरमॅटमध्ये फार बदल नसला तरीही तो अधिकाधिक इंटरेस्टिंग बनवण्यासाठी नवनवीन टास्क त्यात पाहायला मिळतील. मुख्य बदल म्हणजे नवीन घराचा आकार पहिल्या पर्वातील घरापेक्षा जास्त मोठा आणि आकर्षक असेल. एवढंच नाही तर आजवर लोणावळ्यात शूट होत असलेला बिग बॉस हा रिऍलिटी शो आता मुंबईतील गोरेगाव फिल्मसिटीत शूट होणार आहे. त्यामुळे शूटिंगसाठी लागणाऱ्या अनेक गोष्टी सहज उपलब्ध करता येणं शक्य होईल, असं या शोचे निर्माते इंडेमोल यांनी सांगितलं आहे.
हे असणार स्पर्धक -
घरात नक्की कोण स्पर्धक असतील याचे प्रोमो पाहून अनेक तर्क लावले जाऊ लागलेत. यात अभिजित बिचुकले, अभिनेत्री रसिका सुनील, अभिनेता माधव देवचक्के, अभिनेत्री किशोरी अंबिये अशी अनेक नावं चर्चेत आहेत. मात्र यातील नक्की कोणते स्पर्धक बिग बॉसच्या घरात दिसतात याचं उत्तर मात्र येत्या २६ मे रोजी हा शो सुरू झाल्यावरच कळेल.