वर्धा - महात्मा गांधीजींची १५० वी जयंती साजरी केली जात आहे. यात विविध उपक्रमांच्या माध्यमातून महात्मा गांधी पुढल्या पिढीला कळावे यासाठी प्रयत्न केले जात आहेत. पण हे करत असताना रटाळ पुस्तकांच्या माध्यमातून नव्हे तर डिजिटल स्वरुपाच्या साह्याने चित्र, डिजिटल गेम, लायब्ररी, चित्रपट आदींची मेजवानी देणारा हा उपक्रम पुढील चार दिवस राबवला जाणार आहे. भारत सरकारच्या माहिती प्रसारण विभागांतर्गत पुणे येथील प्रदेश लोकसंपर्क ब्युरोच्यावतीने या प्रदर्शनाचे आयोजन लोक महाविद्यालयाच्या प्रांगणात करण्यात आले.
सर्वत्र डिजिटल जगाकडे वाटचाल होताना 150 व्या जयंती वर्षात मुलांना महात्मा गांधी समजून घेताना नाविन्य वाटावे यासाठीच या मल्टिमीडिया स्त्रोतांच्या मदतीने हे प्रदर्शन तयार करण्यात आले. इथे वेग वेगळ्या टचस्क्रीन आहेत, ज्याला स्पर्श करताच गांधी जीवनातील अनेक प्रसंग समजून घेता येतात. यासह विविध उपकरणाच्या साहाय्याने प्रदर्शनात एलसीडी टचस्क्रीन, डिजिटल फ्लिप बुक, मिनी थियेटर, बायोस्कोप, एआर गेम, डिझिटल सेल्फी कॉर्नर, स्वच्छ ग्राम मॉडेल (टच स्क्रीन), डस्टबिन विद स्क्रीन आदींच्या माध्यमातून जीवनातील वेग वेगळे प्रसन्न केवळ वाचताच नाही तर पाहून एकूण समजून घेता येईल, असे हे प्रदर्शन आहे.