मुंबई - गेल्या ३ महिन्यांपासून सुरू असलेला महाराष्ट्राच्या अप्सरेचा शोध अखेर संपला आहे. टॉप पाच अप्सरांमध्ये रंगलेल्या अंतिम फेरीत साताऱ्याची माधुरी पवार ही विजयी ठरली आहे. या स्पर्धेत सहभागी झालेल्या १४ अप्सरांमधून केवळ टॉप पाच अप्सरा या कार्यक्रमात टिकल्या आणि त्यांनी त्यांच्या नृत्याने संपूर्ण महाराष्ट्राला वेड लावले.
मालवणची लाडूबाई ऋतुजा राणे , साताऱ्याची गुलछडी माधुरी पवार, डोंबिवली फास्ट किन्नरी दामा, पुण्याची ऑलराऊंडर ऐश्वर्या काळे आणि पुण्याची मैना श्वेता परदेशी या ५ जणींनी त्यांचा सर्वोत्तम परफॉर्मन्स देत महाअंतिम फेरीपर्यंत धडक मारली. पारंपरिक लावणीचा साज आणि अस्सल मातीची लावणी करत अनेक परफॉर्मन्स मधून बंदा रुपया परफॉर्मन्सचा मान मिळवत साताऱ्याची गुलछडी म्हणजेच माधुरी पवारने संपूर्ण महाराष्ट्राला लावणीच्या ठेक्यावर नाचवले.
लावणीचा अस्सल ठसा जपून वेगवेगळ्या फॉर्ममधून लावणी मंचावर सादर करताना ऑल राउंडर ही पदवी मिळवणाऱ्या ऐश्वर्या काळेने या मंचाला एका वेगळ्या उंचीवर नेले. या पाचही जणींच्या लावणीच्या जुगलबंदीनं महाअंतिम फेरीची चुरस वाढवली होती. मात्र इतर ४ जणींना मात देत साताऱ्याच्या माधुरी पवारने बाजी मारली आणि ती बनली महाराष्ट्राची पहिली अप्सरा. महागुरू सचिन पिळगांवकर यांनी या कार्यक्रमाचे परीक्षण केले. लवकरच अप्सरा आली या कार्यक्रमाच्या महाअंतिम सोहळ्यात या अप्सरांचा नृत्य जलवा आपल्याला प्रत्यक्ष अनुभवायला मिळेल.