मुंबई - 'लाखात एक आपला फौजी' असं म्हणायला लावणाऱ्या ‘लागीरं झालं जी’ या ‘झी मराठी’ वरील मालिकेने गेल्या दीड वर्षामध्ये संपूर्ण महाराष्ट्राच्या जनतेच्या मनात घर केलं आहे. या मालिकेत आपल्या घरातीलच वाटावा असा युवक, म्हणजे अजिंक्य शिंदे याचा एका सामान्य मुलापासून फौजी होण्याचा प्रवास पूर्ण होताना दाखवला जात आहे. आज्या आणि शितल यांच्या व्यक्तिरेखा प्रेक्षकांच्या मनावर अक्षरशः अधिराज्य करत आहेत.
सध्या मालिकेत प्रेक्षकांनी पाहिलं की अजिंक्यच्या हाताला दुखापत झाल्यामुळे अजिंक्यावर उपचार सुरू आहेत आणि तो कामावर रुजू झालेला नाही. घरातील लोकांच्या मते अजिंक्यने पुन्हा आर्मीत रुजू होऊ नये, पण सगळ्यांचा विरोध पत्करून अजिंक्य आणि शीतल दोघे ही अजिंक्य आर्मीत पुन्हा रुजू होण्यासाठी शर्थीचे प्रयत्न करत आहेत. मालिकेत अजून एक रंजक वळण म्हणजे शितल आणि अजिंक्य यांच्या आयुष्यात नवीन पाहुणा येणार आहे.
ही आनंदाची बातमी त्या दोघांनी घरी कोणालाच सांगितली नाही. कारण ही बातमी ऐकून घरचे अजिंक्यला कामावर रुजू होऊ देणार नाहीत. मात्र, ही बातमी ऐकून अजिंक्य खूपच खुश आहे. ही आनंदाची बातमी घरी समजल्यावर घरच्यांची काय प्रतिक्रिया असेल, हे प्रेक्षकांना येत्या काही भागांत पाहायला मिळणार आहे.