स्टार प्रवाहवर सुरु होणाऱ्या ‘जय भवानी जय शिवाजी’ मालिकेतील छत्रपती शिवरायांच्या शिलेदारांची, आणि ते साकारत असलेल्या कलाकारांची, ओळख होत गेली. या भव्यदिव्य मालिकेतून बाजीप्रभू देशपांडेंच्या भूमिकेत अजिंक्य देव, छत्रपती शिवरायांच्या भूमिकेत भूषण प्रधान, नेतोजी पालकरांच्या भूमिकेत कश्पय परुळेकर आणि शिवा काशिदच्या भूमिकेत विशाल निकम अशी दमदार कलाकारांची फौज या प्रेक्षकांच्या भेटीला येईल. छत्रपती शिवरायांच्या शिलेदारांची ही गोष्ट प्रेक्षकांच्या भेटीला लवकरच येत आहे.
आता शिवकालीन अतिशय महत्वाचं पात्र म्हणजे जिजामाता. जिजाऊंची भूमिका कोण साकारणार याची कमालीची उत्सुकता होती. जिजाऊंची भूमिका साकारण्यासाठी कलाकारदेखील तितकाच तगडा हवा होता. छत्रपती शिवरायांना स्वराज्याचं बाळकडू देणाऱ्या राजमाता जिजाऊ यांची भूमिका साकारणार आहेत सुप्रसिद्ध अभिनेत्री निशिगंधा वाड.
जवळपास १० वर्षांनंतर निशिगंधा ताई मराठी टेलिव्हिजन करत आहेत. या दमदार कमबॅकसाठी त्या खुपच उत्सुक आहेत. निशिगंधा वाड म्हणाल्या की, ‘मी इतिहासाची अभ्यासक आहेत. त्यामुळे जिजाऊ साकारणं हा अत्यंत सुखद अनुभव आहे. अशी पालनकृत, ताठ कण्याची, कर्तबगार, कर्तृत्ववान जिजाऊ साकारणं हे खूप भाग्याचं आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्य स्थापनेमध्ये त्यांचा मोलाचा वाटा आहे. इतकी कणखर भूमिका साकारायला मिळणं हा दैवी योग आहे.’
‘जय भवानी जय शिवाजी’ या भव्यदिव्य मालिकेविषयी सांगताना निशिगंधा वाड म्हणाल्या, ‘छत्रपती शिवरायांसाठी समर्पण दिलेल्या शिलेदारांची गोष्ट मालिकेच्या रुपात उलगडणार आहे. मी स्वत:ला भाग्यवान समजते की मी देखिल या महत्त्वाकांक्षी मालिकेचा अंश आहे. अभ्यासपूर्वक माझ्या वाटेला आलेलं हे पात्र साकारताना मी कुठेही कमी पडू नये यासाठी माझे प्रयत्न सुरु आहेत. हे पात्र साकारताना आणि जिजाऊंच्या रुपात उभं करण्यामागे बऱ्याच जणांचे कष्ट आहेत. अगदी लेखकापासून, दिग्दर्शक, मेकअपमनपासून प्रत्येकाची मेहनत आहे. जय भवानी जय शिवाजी ही मालिका स्टार प्रवाहचा अभिनव उपक्रम आहे.’
हेही वाचा - शिल्पा शेट्टीची दुहेरी परिक्षा... 'हंगामा 2' आज प्रदर्शित तर राज कुंद्राला 27 जुलैपर्यंत पोलीस कोठडी