मुंबई - बॉलिवूडचा भिडू म्हणजेच अभिनेता जॅकी श्रॉफ याने अनेक संकटांवर मात करत संघर्षातून चंदेरी दुनियेत आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे. बॉलिवूडचा 'हिरो' बनण्यापूर्वी जॅकी श्रॉफने अनेक वाईट परिस्थितींना तोंड दिले. अलिकडेच त्याने छोट्या पडद्यावरील 'सुपर डान्सर-३' या रिअॅलिटी शोमध्ये हजेरी लावली होती. या शोमध्ये सुरुवातीच्या काळातील आपली संघर्षगाथा सांगताना तो भावुक झालेला पाहायला मिळाला.
जॅकी श्रॉफने त्याच्या आयुष्यातील ३३ वर्षे एका चाळीमध्ये घालवली. त्यांच्या घरची परिस्थिती हलाखीची असताना त्यांच्या शाळेची फी भरण्यासाठी त्यांची आई घरातील भांडी आणि साड्या विकायची, असे त्याने या कार्यक्रमात सांगितले. प्रत्येकाच्या अंगात एक कला असते. ती जर ओळखता आली, तर त्या कलेच्या जोरावर आपण जगात काहीही मिळवू शकतो, असेही तो म्हणाला. तो ज्या चाळीत राहायचा त्या चाळीचा त्याला लळा लागला होता. त्यामुळे तो हिरो झाल्यावरही त्या चाळीतच काही दिवस राहत होता.
जॅकी श्रॉफ आणि जॉन अब्राहम यांचा 'रोमियो अकबर वॉल्टर' हा चित्रपट लवकरच प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटाच्या प्रमोशनसाठी तो या कार्यक्रमात आला होता. यावेळी त्याच्या संघर्षगाथेने कार्यक्रमातील प्रेक्षकांसह परिक्षकही भावुक झालेले पाहायला मिळाले.