‘मन उडू उडू झालं’ मालिकेतील इंद्रा आणि दिपूची प्रेमकहाणी निर्णायक वळणावर आलेली आहे. इंद्रा दिपू वरील प्रेम व्यक्त करत लग्नाची मागणी घालणार असून तो हे जमिनीपासून दूर उंचावर आकाशाला गवसणी घालत करणार आहे. इंद्रा एकदम ग्रँड पद्धतीने दिपूला प्रपोज करणार आहे. झी मराठीवरील ‘मन उडू उडू झालं’ या मालिकेने प्रेक्षकांची मनं जिंकली आहेत. ही मालिका अल्पावधीत त्यांची आवडती बनली असून त्यातील व्यक्तिरेखा देखील प्रेक्षकांना आपल्याशा वाटतात.
‘मन उडू उडू झालं’ मालिकेचं कथानक आणि इंद्रा दिपूची जोडी याला प्रेक्षकांनी पसंती दर्शवली आहे. नुकतंच प्रेक्षकांनी मालिकेत पाहिलं की सानिका आणि कार्तिकच्या नात्याला देशपांडे सरांचा विरोध असल्यामुळे ते सानिकाचं एका चांगल्या मुलासोबत लग्न लावून द्यायचं ठरवतात आणि तिच्यासाठी इंद्रजित साळगावकरच स्थळ सुचवतात. एकीकडे इंद्रा दिपूचा होकार मिळवण्यासाठी झुरतोय तर दुसरीकडे दिपू त्याला देशपांडे सरांचं ऐकून सानिकाशी लग्न करायला भाग पाडतेय. पण इंद्रा हार मानणाऱ्यातला नाही आहे त्यामुळे त्याने दिपूचा होकार मिळवण्याचं मनाशी पक्क केलं आहे.
इंद्रा स्टाईलमध्ये इंद्रा जेव्हा गोष्टी करतो तेव्हा त्या खूप ग्रँड असतात त्यामुळे इंद्रा जेव्हा दिपूला प्रपोज करेल तो क्षण किती ग्रँड असेल याची प्रेक्षक कल्पना सुद्धा करू शकत नाहीत. इंद्रा दिपूला चक्क आकाशाला गवसणी घालत प्रपोज करणार आहे. हो, इंद्रा दिपूला हॉट एअर बलूनमध्ये प्रपोज करणार आहे. हा प्रसंग चित्रित करताना इंद्रा आणि दिपूने आकाशाला गवसणी घालत १५० फुटावर चित्रीकरण केलं. आज पर्यंत कुठल्याच मालिकेत इतका ग्रँड सिन झाला नाहीये जे प्रेक्षकांना ‘मन उडू उडू झालं’ या मालिकेत अनुभवता येणार आहे. इंद्राने इतक्या अनोख्या पद्धतीने प्रपोज केल्यावर दिपू त्याला होकार देईल का आणि दिपू इंद्राच्या प्रेमाचा स्वीकार करून त्याची साथ देईल का हे प्रेक्षकांना पुढील आठवड्यात पाहायला मिळेल.
इंद्रा आणि दिपू यांच्या आयुष्यातील हा खास व महत्वाचा क्षण ‘मन उडू उडू झालं’ मालिकेत मंगळवार २५ जानेवारी रोजी झी मराठीवर प्रसारित होईल.
हेही वाचा - गुरु युलिया वंतूरचे 'मैं चला' गाणे रिलीज, सलमानच्या चाहत्यांना पर्वणी