रायगड - 'रंगल्या रात्री अशा' या सिनेमात वसंत पवार लिखित 'नाव गाव कशाला हो पुसता मी आहे कोल्हापूरची लवंगी मिरची', हे गाणे गायची संधी सुलोचना चव्हाण यांना मिळाली. याआधी त्या हिंदी, गुजराती, पंजाबी, तामिळ सिनेमांत गाणी गात असतं. मात्र अचानक लावणी गाण्याची संधी आल्याने त्या थोड्या बावरल्या. पण लवंगी मिरची या पहिल्याच लावणी गाण्याने त्यांना वेगळी ओळख निर्माण करून दिली. त्यानंतर मराठी सिनेमातील प्रत्येक लावणी म्हणजे सुलोचना चव्हाण असे गणित झाले आणि त्यांना लावणीसम्राज्ञी गायिका म्हणून ओळख मिळाली.
याबाबत ईटीव्ही भारतने त्यांच्याशी बातचीत केली. यावेळी पूर्वीची लावणी आणि आताची लावणी यात असलेल्या फरकाबाबत विचारले असता, लावणीमध्ये फरक झालेला नाही. लावणी गाणे ही जिकरीचे काम आहे. ते गाताना त्यातील शब्दांचा अर्थ गळ्यातून आला पाहिजे, नुसतं सुरात गायलं म्हणजे गाणं होत नाही, असे सुलोचना चव्हाण म्हणाल्या.
सुलोचना चव्हाण यांना आता ऐकायला कमी येत असले तरी त्यांचा आवाज आजही तसाच आहे. अनेकांना मदतीचा हात पुढे केल्याचेही सुलोचना चव्हाण यांनी सांगितले. तर साधी राहणी असल्याने अनेक कार्यक्रमात निमंत्रित असूनही मला सुरक्षा रक्षकाने अडवले असल्याचा विनोदी भागही त्यांनी यावेळी बोलून दाखविला. सुलोचना चव्हाण यांचा मृदू स्वभाव व गाण्याबाबत असलेले प्रेम त्यांच्या दिलखुलास मुलाखतीमधून समोर आले आहे.