या वर्षीच्या सुरुवातीपासून, पुनीत बालन यांनी काश्मीरमध्ये भारतीय सैन्य दलाच्या विविध सामाजिक उपक्रमांमध्ये आपल्या ‘इंद्राणी बालन फाऊंडेशन’ च्या माध्यमातून सक्रीय सहभाग घेण्यास सुरुवात केली आहे. ‘इंद्राणी बालन फाऊंडेशन’ ने काश्मीर खोऱ्यातील उरी, त्रेघगाम, वेन, हाजीनार आणि बारामुल्ला येथील स्पेशल मुलांसाठी असलेल्या ५ ‘गुडविल स्कूल्स’ ना मदत करण्यासाठी भारतीय सैन्य दलाच्या ‘चिनार कॉर्पस’ या विभागासोबत करार केला आहे. ‘इंद्राणी बालन फाऊंडेशन’ च्या ‘नेशन फर्स्ट’ या उपक्रमांतर्गत हे मदतकार्य सुरु आहे.
भारतीय सैन्य दल आणि ‘इंद्राणी बालन फाऊंडेशन’ यांच्यातील मैत्रीपूर्ण नात्यातून ‘इंद्राणी बालन फाऊंडेशन’ तर्फे वेळोवेळी काश्मीरमधील समाजोन्नतीसाठी मदतीचा हात पुढे केला जातो. त्यामुळे सध्याच्या कोविड साथरोगाच्या कठीण काळात पुनीत बालन यांनी बारामुल्ला येथील भारतीय सैन्य दलातर्फे चालवण्यात येणाऱ्या कोविड हॉस्पिटलला १५, श्रीनगर येथे चिनार कॉर्प्सला १० आणि सैन्य दलातील इतर विभाग आणि काश्मीर विमानतळावरील सेन्ट्रल आर्म्ड पोलिस फोर्स यांना मिळून ५ असे एकूण ३० ‘ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर्स’ सामाजिक मदत म्हणून दिले आहेत. ‘इंद्राणी बालन फाऊंडेशन’ च्या या स्तुत्य उपक्रमाची उल्लेखनीय दखल घेऊन, 'कोअर कमांडर' लेफ्ट. जन. डी. पी. पांडे यांनी बालन यांचे आभार मानले.
पुनीत बालन हे एक समाजभान असणारे तरुण उद्योजक असून निरनिराळ्या सामाजिक उपक्रमांमध्ये सक्रीय सहभागी असतात. गेल्या वर्षी २०२० पासून कोविड साथरोग काळात पुनीत बालन पुण्यामध्ये समाजातील विविध स्तरांवर वेगवेळ्या स्वरुपाची खूप मोठी मदत करत आले आहेत. समाजातील दुर्बल व्यक्तींना आणि दुर्बल व्यक्तींसाठी काम करणाऱ्या संस्थांना मदत म्हणून विविध सामाजिक उपक्रमांमध्ये गेली अनेक वर्षे पुनीत बालन मोठे योगदान देत आले आहेत.
या बाबत बोलताना "महाराष्ट्रात सुरु असलेल्या मदत कार्याचा पुढचा टप्पा म्हणून काश्मीर खोऱ्यात पसरत असलेल्या कोरोना साथीच्या पार्श्वभूमीवर ‘इंद्राणी बालन फाऊंडेशन’ तर्फे देण्यात आलेल्या ३० ‘ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर्स’ व्यतिरिक्त भारतीय सैन्य दल यांना 'काश्मिरी आवाम'साठी जी वैद्यकीय मदत लागेल ती आमच्या संपूर्ण क्षमतेने करण्यासाठी एक जबाबदार भारतीय नागरिक म्हणून मी कटिबद्ध आहे" असे पुनीत बालन यांनी नमूद केले.
हेही वाचा - चित्रपटाबद्दल उत्सुकता वाढविणारा विद्या बालनच्या ‘शेरनी’चा टिझर झाला प्रदर्शित!