मुंबई - गेल्या वर्षी कोरोना उद्रेकामुळे होळीसकट सगळेच सण विना-धूमधडाका साजरे करावे लागले. यावर्षी तरी होळी पूर्ण जोशात साजरी करायला मिळेल असे वाटत असताना कोरोनाने पुन्हा डोके वर काढले आहे. मराठी मालिकांमध्ये जोशपूर्ण वातावरणात साजरा होणार होळी हा सण यावर्षी साधेपणाने साजरा करावा लागणार आहे. ‘आई कुठे काय करते’ या मालिकेमध्ये होळीपूजाविधी कुटुंबाच्या उपस्थितीतच पार पडणार आहेत.
सण कोणताही असो देशमुखांच्या घरी त्याची तयारी खूप आधीपासून सुरु होते. अरुंधतीच्या तर उत्साहाला पारावर नसतो. सध्या अनिरुद्ध-संजना प्रकरणामुळे घरात चिंतेचं वातावरण असलं तरी होळीचा सण मात्र एकत्रित येऊन साजरा करण्याचं सर्वांनी ठरवलं आहे. स्टार प्रवाहवरील ‘आई कुठे काय करते’ मालिकेत यंदाच्या उत्सवावर कोरोनाचं सावट असल्यामुळे पूजाविधी कुटुंबाच्या उपस्थितीतच पार पडणार आहेत. देशमुख कुटुंबात आनंदाचं वातावरण असताना संजनाची एण्ट्री झाली नाही तरच नवल. होळीच्या या पारंपरिक पूजेत संजनालादेखील सहभागी करावं अशी अनिरुद्धची इच्छा असते. अनिरुद्धच्या अशा वागण्याने साहजिकच अरुंधती दुखावली जाते.
देशमुखांच्या होळीच्या या पुजाविधीमध्ये संजना सहभागी होणार का हे मालिकेच्या २८ मार्चच्या महाएपिसोडमध्ये पाहायला मिळणार आहे. ‘आई कुठे काय करते’ मालिकेचा होळी-स्पेशल महाएपिसोड रविवार २८ मार्चला दुपारी १२ आणि सायंकाळी ७ वाजता स्टार प्रवाहवर प्रसारित होणार आहे.
हेही वाचा - ‘राजा’ आणि ‘रानी’ ‘जोडी’ने खेळणार होळी!