मुंबई - कुठे भेटलात दोघं? कसं जमलं? तुमच्या मिस्टरांना कशी हाक मारता? कुणी कुणाला आधी लग्नासाठी विचारलं? दोघांपैकी कोण जास्त चिडतं? मिस्टर फिरायला नेतात का? असे खुमासदार प्रश्न विचारत घराघरात रंगणाऱ्या होम मिनिस्टरचा फॅन क्लब चांगलाच वाढला आहे. लॉकडाऊनच्या काळात भाऊजी 'होम मिनिस्टर घरच्याघरी'द्वारे तमाम वहिनींची ऑनलाईन भेट घेत आहेत.
महाराष्ट्रातल्या सर्वसामान्य घरातील वहिनींपासून ते सेलिब्रिटी सौभाग्यवतींना बोलतं करणाऱ्या या होम मिनिस्टर घरच्याघरी मध्ये लवकरच अशा 'सौं' ना भेटण्याची संधी मिळणार आहे, ज्या विठ्ठलाच्या नगरीमध्ये राहतात.आषाढी एकादशी निमित्त होम मिनिस्टर घरच्याघरी कार्यक्रमात या आठवड्यात खास भाग प्रदर्शित करण्यात येणार आहेत आणि म्हणूनच बांदेकर भाऊजींनी थेट पंढरपूरची ऑनलाईन वारी केली.
२२ जुन ते १ जुलैदरम्यान प्रदर्शित होणाऱ्या वारी स्पेशल एपिसोड्स मध्ये आदेश बांदेकर आळंदी, देहू, फलटण, पंढरपूर या ठिकाणी स्थायिक असलेल्या वहिनींची भेट घेणार आहेत. तेव्हा आषाढी एकादशी निमित्त खास होम मिनिस्टर घरच्याघरी वारी विशेष भाग प्रसारित होणार आहे. काय माहीत यंदा माऊलीच्या पादुकांना स्पर्श करायला मिळणार नसला तर एखादी गृहलक्ष्मी तिच्या गुणांनी आपल्याला अनोखी दृष्टी दाखवून जाईल.