मुंबई - अभिनेता हर्षवर्धन राणे याने आपल्या अनोख्या डबिंगची आठवण सांगितली. तैशच्या टिझर रिलीजपूर्वी हर्षवर्धन रुग्णालयात कोविड-१९वर उपचार घेत होता. त्यामुळे त्याने रुग्णालयातील आयसीयूमधून डबिंग केले होते.
हर्षवर्धन म्हणाला, ''मी आयसीयूमध्ये होतो. तिथे डबींग करणे शक्य नव्हते. मी १२ चादरींचा उपयोग करून हे शक्य साधले. मी जेव्हा इतक्या चादरी मागितल्या, तेव्हा डॉक्टर घाबरले. त्यांना वाटले की, मला थंडी वाजत आहे. मी त्यांना सांगितले की, मला डबिंगसाठी चादरींची आश्यकता आहे. मी खोली बंद केली आणि त्यांना सांगितले की मी कपडे बदलत आहे.''
हर्षावर्धन म्हणाला, ''मी लगेच चादरीचा वापर करुन एक गुहा बनवली आणि हार्टरेट मॉनिटर बंद केला, कारण तो फार आवाज करीत होता. मी माझा फोन एअरप्लेन मोडवर टाकला. बेजॉय नांबियार (दिग्दर्शक) सर माफी मागत होते. त्यांना मी रुग्णालयातून डब करणे आवडले नव्हते. हा संपूर्ण माझा निर्णय होता. माझ्यामुळे कोणाला त्रास होऊ नये, असे मला वाटत होते. मी कामासाठी वाट्टेल ते करु शकतो. इतकं की, जर मला रुग्णालयातून अभिनय करायला सांगितला असता तरी, तो केला असता.''
आपला डबिंगचा अनुभव सांगणाऱ्या हर्षवर्धनने लोकांना मानसिकदृष्ट्या मजबूत राहण्याचा सल्ला दिला आहे. तो म्हणाले, "हे खूप कठीण आहे, परंतु त्यास सामोरे जाण्यासाठी मानसिकदृष्ट्या दृढ असणे महत्वाचे आहे. स्वतःची योग्य काळजी घ्या आणि खबरदारीच्या उपाययोजना करा. ताण घेऊ नका."
'तैश' हा बेजॉय नाम्बियार दिग्दर्शित सूडनाट्य असलेला चित्रपट आहे. यात पुलकित सम्राट, कृती खरबंदा, जिम सर्भ आणि संजीदा शेख यांच्या प्रमुख भूमिका आहेत. २९ ऑक्टोबरला झी ५ वर चित्रपट प्रदर्शित होईल.