बडवानी (मध्य प्रदेश) - मध्य प्रदेशातील बडवानी येथे टीव्ही अभिनेत्री मुनमुन दत्ताविरोधात शुक्रवारी एफआयआर नोंदविण्यात आली. फिर्यादी मनीष सांखले यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर नुकत्याच पोस्ट केलेल्या एका व्हिडिओमध्ये दत्ता यांनी जातीवाचक शब्द वापरल्याचा आरोप केला आहे.
सोमवारी, टेलिव्हिजन अभिनेत्री मुनमुन दत्ताच्या अटकेची मागणी करणाऱया हॅशटॅगने ट्विटरवर ट्रेंड करण्यास सुरुवात केली. नेटिझन्सने तिच्या ताज्या यूट्यूब व्हिडिओमध्ये जातीवादी शब्द असल्याचे म्हटले आहे. ‘तारक मेहता का उल्टा चश्मा’मधील बबिताच्या भूमिकेसाठी प्रसिध्द असलेल्या मुनमुनने झाल्या प्रकाराबद्दल माफी मागितली आहे.
व्हिडिओमध्ये, मुनमुनने आपल्या मेक अपबद्दल बोलताना आपल्याला घाण दिसायचे नाही असे म्हणताना एका समुदायाच्या नावाचा उल्लेख केला होता. त्यानंतर हा व्हिडिओ व्हायरल झाला. ज्या समुदायाचा उल्लेख झाला त्यांनी देशभर यावर प्रतिक्रिया दिली. अनेक ठिकाणी मुनमुनला अटक करण्याची मागणी जोर धरू लागली. अनेक ठिकाणी सध्या कोरोनाचा काळ असतानाही निदर्शने झाली. मुनमुनने आपली चुक झाल्याचे मान्य करीत अनावधानाने हे घडल्याचे सांगत दिलगीरी व्यक्त केली आहे. तिने माफीचे निवेदन आपल्या सोशल मीडियावरुन प्रसिध्द केलंय.
बोलण्याच्या ओघात हा शब्द तोंडून गेला. कुणाच्याही भावना दुखवण्याचा, अपमान करण्याचा हेतू नव्हता, असे तिने ट्विटरवर म्हटले आहे.
"माझ्या भाषेच्या अडथळ्यामुळे, मी या शब्दाच्या अर्थाबद्दल योग्य ज्ञान नसल्यामुळे मी हे बोलले. जेव्हा मला त्याचा अर्थ कळला की मी ताबडतोब तो भाग काढून टाकला. प्रत्येक जाती, धर्म किंवा लिंगातील प्रत्येक व्यक्तीबद्दल मला अत्यंत आदर आहे आणि आमच्या समाजात किंवा राष्ट्रासाठी त्यांचे अतुलनीय योगदान आहे, "असे तिने आपल्या माफीनाम्यात म्हटले होते.
"या शब्दाच्या वापरामुळे जे लोक नकळत दुखावले गेले अशा प्रत्येक व्यक्तीची मी दिलगिरी व्यक्त करते आणि त्याबद्दल मनापासून माफी मागते," असे तिने पुढे लिहिले.
तिने दिलगीरी व्यक्त केली असली तरी हा व्हिडिओ अजूनही व्हायरल आहे. त्यामुळे अनेकांनी तिच्यावर तीव्र टीका केली आहे. अनेकांनी तिला अटक करावी अशी मागणी केली आहे. तिच्यावर गुन्हा दाखल झाला असल्यामुळे तिला कधीही अटक होऊ शकते.
यापूर्वी बुधवारी मुनमुनच्या विरोधात जातीवाचक आणि अपमानजनक शब्दांचा वापर केल्यामुळे हरियाणा राज्यातील हांसीमध्ये तक्रार दाखल करण्यात आली आहे.
हेही वाचा - तारक मेहता...'मधील 'बबिता'ला कुठल्याही क्षणी होऊ शकते अटक