मुंबई - पुलवामा येथे सीआरपीएफच्या जवानांवर झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर बॉलिवूड मधून त्याची प्रतिक्रिया उमटली होती. तर, अनेक कलाकारांनी त्यांच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मचा आधार घेऊन आपला राग व्यक्त केला होता. वीरमरण आलेल्या जवानांना श्रध्दांजली अर्पण करण्यासाठी 'फेडरेशन ऑफ ऑल इंडिया सिने इम्पोईज असोसिएशन'ने आज 'ब्लॅक डे' पाळला. यावेळी दुपारी २ ते ४ वाजेपर्यंत फिल्मसिटीत सर्व शूटिंग बंद ठेवण्यात आली.
यावेळी दिग्दर्शक अशोक पंडित, दिग्दर्शक मेहुल कुमार, अभिनेता गजेंद्र चौहान, भाजप खासदार किरीट सोमय्या, अभिनेत्री ईशा कोप्पीकर हे उपस्थित होते. त्यांच्याशिवाय फिल्मसिटीत शूटिंगसाठी जमलेले भारतीय क्रिकेट टीमचे माजी सदस्य विरेंद्र सेहवाग, हरभजन सिंह, सुरेश रैना, मोहम्मद कैफ, व्ही. व्ही. एस. लक्ष्मण हे देखील सहभागी झाले होते. गायक संगीतकार सलीम शेख आणि मराठी अभिनेत्री सोनाली जोशी आणि वर्षा दांडळे, यांनीही यात सहभाग घेतला.
यावेळी शहीद जवानांना श्रध्दांजली अर्पण करण्यात आली. तसेच पाकिस्तानचे अध्यक्ष इमरान खान आणि पाक सैन्यदलाचे अध्यक्ष बजवा आणि हाफिज सईद यांच्या पुतळ्याचे दहन करुन या हल्ल्याचा निषेध करण्यात आला.