मुंबई - 'व्हॅलेंटाईन डे' नुकताच मोठ्या उत्साहात जगभर साजरा झाला. अनेक प्रेमीयुगुलानी एकमेकांसोबत प्रेमाच्या आणाभाका घेतल्या असतील काहींनी एकमेकांना गिफ्ट्स दिली असतील, कुणी भावी आयुष्याची स्वप्न पहिली असतील. मात्र, प्रेमात नक्की किती समर्पणाची तयारी असावी लागते, हे जर जाणून घ्यायचं असेल तर तुम्हाला 'आनंदी गोपाळ' हा सिनेमा पहायलाच हवा.
सिनेमाची सुरुवात होते ती कल्याण मधील यमुनेच्या घरातून आनंदीचं लग्न लावून टाकण्याची खटपट आई वडील (योगेश सोमण आणि क्षिती जोग) करत असतात. अशात सोमण बुवा (जयंत सावरकर) छोट्या यमुसाठी ठाण्याच्या पोस्टात काम करणाऱ्या गोपाळराव जोशीचं ( ललित प्रभाकर) स्थळ घेऊन येतात. गोपाळराव बीजवर असले तरीही हुंडा, मानपान करण्याचा विरोधात असल्याने हे स्थळ यमुसाठी नक्की केलं जातं. फक्त त्यांची एक अट असते, ती म्हणजे मुलीला लिहिता वाचता यायला हवं. त्याशिवाय तिला लग्नानंतर शिकवण्याचा निर्णय ते घेतात. त्यानंतर गोपळरावाशी लग्न करून यमू आनंदीबाई गोपाळराव जोशी बनते.
लग्नापूर्वी सगळं मान्य करणारे यमुचे आई वडील मनातून मात्र स्त्री शिक्षण म्हणजे व्यभिचाराला आमंत्रण असल्याच सांगत आधी तिच्या शिक्षणात अडथळे निर्माण करतात. मात्र, गोपाळरावांच्या हट्टीपणापुढे अखेर आनंदीचं प्राथमिक शिक्षण सुरू होतं. त्यानंतर ते आनंदीबाईना घेऊन अलिबागला येतात आणि दोघांचा संसार आणि अभ्यास दोन्ही सुरू होतो. मात्र, त्याचवेळी गोपाळरावांच्या पहिल्या पत्नीच्या वडिलांचं निधन होते. त्यामुळे त्यांना त्याचा पहिल्या पत्नीपासूनचा मुलगा कृष्णा आणि सासूबाई (गीतांजली कुलकर्णी) यांना घेऊन घरी यावं लागतं. त्याच दरम्यान आनंदी आणि गोपाळराव यांच्या आयुष्यात अशी घटना घडते, की ज्यामुळे त्यांचं आयुष्य पूर्णपणे बदलून जात.
गोपळरावांचा तर्हेवाईक स्वभाव आणि त्याचा स्त्री शिक्षणाचा हट्ट हा आता आनंदीबाईंसाठी ध्यास बनतो. त्या डॉक्टर होण्याचा निर्णय घेतात. मात्र, त्यासाठी त्यांना पदोपदी कडाडून विरोध होतो. अखेर गोपाळराव त्यांना विलायतेत डॉक्टर बनण्यासाठी पाठवण्याचा निर्णय घेतात. त्यासाठी या जोडप्याला जो संघर्ष करावा लागतो तेच या सिनेमाचं वेगळेपण आहे.
अभिनेता ललित प्रभाकरने गोपाळराव जोशींची भूमिका अतिशय समंजसपणे साकारली आहे. दिवसेंदिवस त्याच्या अभिनयाची ताकद वाढत चाललीय. त्याच्या अभिनय कारकिर्दीतील ही सर्वोत्कृष्ट भूमिका आहे, असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. अभिनेत्री भाग्यश्री मिलिंद हिनेही आनंदीबाईंची भूमिका चांगली वठवलीय. त्यातील प्रत्येक बारकावे हेरून स्क्रीनवर आणण्यात ती यशस्वी ठरली आहे. बाकी कलाकारांच्या भूमिका चोख झाल्यात.
खर तर या विषयात संगीताला फारसं स्थान नव्हतं. मात्र, तरीही कथेत अचूक जागा हेरून गाण्याची अचूक मांडणी करण्यात आलीयेत. प्रसंग पुढे नेण्यासाठी त्याचा सुरेख वापर करण्यात आलाय. सिनेमातील सगळी गाणी अतिशय श्रवणीय आहेत. या संगीतासाठी जसराज-ऋषिकेश-सौरभ या त्रयीला श्रेय द्यायला हवे. गीतकार वैभव जोशी यांनी या गाण्यांना शब्दबद्ध केले आहे. त्यांनाही विशेष दाद द्यायला हवी.
एका यशस्वी पुरुषाच्या मागे कायम एक स्त्री असते, याची अनेक उदाहरणं आपण पाहिली आहेत. मात्र, एका स्त्रीला पुढे आणण्यासाठी एक पुरुष खंबीरपणे उभा राहीला तर काय होऊ शकत, हे या सिनेमातुन पहायला मिळते. पत्नीला डॉक्टर करण्याच स्वप्न गोपळरावांनी पाहिलं आणि अनदीबाईंनी त्या स्वप्नाला प्रयत्नांची जोड दिली. डॉक्टर बनून देशवासियांची सेवा करण्याचं त्या दोघांच स्वप्न अर्धवट राहिलं खर, मात्र त्यानंतर अनेक महिलांनी त्यांच्याकडून प्रेरणा घेत ते करून दाखवलं. आणि त्यामुळेच या सामान्य जोडप्याची प्रेमकहाणी असामान्य ठरली.