मुंबई - अभिनेत्री दीपिका पादुकोणने सध्या लॉकडाऊनच्या काळात तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून एक नवीन ट्रेंड सुरू केला आहे, ज्याचे नाव आहे 'फॅन आर्ट शुक्रवार'. दीपिकाने 'फॅन आर्ट शुक्रवार' या ट्रेण्डद्वारे तिच्या चाहत्यांनी बनविलेले तिचे खास स्केचेस पोस्ट करणार आहे. त्याद्वारे चाहत्यांच्या कलागुणांचं जाहीर कौतुक करण्याचा तिचा मानस असून त्यासाठी तिने पुढाकार घेत ही मालिका सुरू केली आहे.
या ट्रेण्डद्वारे ती आपल्या चाहत्यांना अधिकाधिक सृजनशील होण्यासाठी प्रोत्साहित करणार असून त्या कलाकाराच्या कलागुणांचं जाहीर कौतुक देखील करणार आहे. चाहत्यांनी पाठवलेले हे स्केचेस दीपिका वैयक्तिकरित्या पाहते, त्यातून तिला आवडेल ते स्केच ती स्वतः निवडते आणि दर शुक्रवारी ती ते पोस्ट करते. नेटिझन्स आणि तिचे चाहते या संपूर्ण प्रक्रियेचा सध्या मनापासून आनंद घेत असून दीपिकाला खूश करण्यासाठी आपल्या कलेचे निरनिराळे आविष्कार दाखवून तिला इंप्रेस करत आहेत.
शुक्रवारच्या या फॅन आर्टसाठी दीपिकाने राहिल गॅलरीने फुललेल्या फुलांचा फोटो शेअर केला आहे. गुलाबी आणि पिवळ्या फुलांच्या पाकळ्यापासून बनविलेली ही एक अतिशय सुंदर कलाकृती आहे. हे रेखाटन पाहताक्षणीच आपले लक्ष वेधून घेते, जसे त्याने दीपिकाचे देखील लक्ष वेधले आहे. हे रेखाटन फारच अनोखे आहे आणि म्हणूनच दीपिकाने ते आपल्या फॅन्ससोबत शेअर केले आहे.
दीपिका पादुकोण ही अशी अभिनेत्री आहे जी आपल्या चाहत्यांप्रती कृतज्ञता व्य़क्त करण्याची एकही संधी सोडत नाही. या अभिनेत्रीचे जगभरात असंख्य चाहते आहेत आणि या ट्रेण्डद्वारे ती तिच्या फॅन्सना देत असलेले प्रोत्साहन तिच्या चाहत्यांसाठी एक अनोखी पर्वणी ठरले आहे. दीपिकाने नुकताच तिच्या सोशल मीडियावर 50 दशलक्ष फॉलोअर्सचा आकडा पार केला आहे आणि चाहत्यांच्या या प्रेमाबद्दल ती अत्यंत ऋणी आहे. दीपिकाने नुकतीच नुकतीच तिच्या नव्या सिनेमाची घोषणा देखील केली असून ज्यात दीपिका आणि प्रभास हे दोघे एकत्र काम करताना दिसणार आहेत. याशिवाय लॉकडाऊन संपताच ती दिग्दर्शक शकुन बत्राच्या आगामी सिनेमाच्या शुटिंगला सुरूवात करेल. या सिनेमात अभिनेता सिद्धांत चतुर्वेदी आणि अभिनेत्री अनन्या पांडे यांच्यासोबत ती काम करताना दिसेल.