नवी दिल्ली - टीव्हीवरील लोकप्रिय मालिका रामायण आता पुन्हा प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे. लॉक डाऊनमुळे घरी बसलेल्या लोकांच्या मनोरंजनासाठी हा निर्णय घेण्यात आलाय. याचे प्रसारण २८ मार्चपासून सुरू होईल. सकाळी ९ वाजता पहिला भाग आणि रात्री ९ वाजता दुसरा भाग प्रसारित होईल. माहिती आणि प्रसारण मंत्री प्रकाश जावडेकर यांनी ट्विट करीत ही माहिती शुक्रवारी दिली आहे.
प्रकाश जावडेकर यांनी आपल्या ट्विटमध्ये लिहिलंय, ''लोकांच्या मागणीवरुन उद्या शनिवारी रामायण मालिका दूरदर्शवर पुन्हा प्रसारित केली जाईल. पहिला भाग सकाळी ९ वाजता आणि दुसरा भाग रात्री ९ वाजता प्रसारित होईल.''
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कोरोना व्हायरस पासून वाचण्यासाठी २१ दिवसांचा लॉक डाऊन केला आहे. दरम्यान, भाजपचे नेते अश्विनी उपाध्याय यांनी दूरदर्शनवर रामायण आणि महाभारत प्रसारित करण्याची मागणी केली होती. यानंतर प्रसार भारतीचे सीईओ शशी शेखर यांनी २६ मार्चपासून पुनः प्रसारणाचे संकेत दिले होते. अखेर माहिती आणि प्रसारण मंत्रालयाने निर्णय घेतला आणि याबाबतची माहिती दिली आहे.
रामायण ही १९८६ ते १९८८ दरम्यान दूरदर्शनवर प्रसारित झालेली एक मालिका होती. संत तुलसीदास यांच्या 'रामचरित मानस' या कथेवर आधारित असलेल्या या मालिकेचे निर्माण व दिग्दर्शन रामानंद सागर यांनी केले होते. याचे एकूण ७८ एपिसोड प्रसारित झाले होते.