मुंबई - ‘सोनी मराठी’ वाहिनीवर नुकत्याच सुरू झालेल्या ‘सिंगिंग स्टार’ या कार्यक्रमाला कोरोनाचा फटका बसला होता. या कार्यक्रमातील दोन स्पर्धक, दोन मेंटर्स आणि एका वादकाला कोरोनाची लागण झाली असल्याचं निष्पन्न झालं आहे. सुदैवाने वेळीच ही बाब लक्षात आल्याने कार्यक्रमाचं शुटिंग थांबवण्यात आलं आणि हे पाचही जण डॉक्टरांच्या निगराणीखाली गृहविलगीकरणात गेले. आता हे सगळेच्या सगळे पूर्णपणे बरे झाले असून लवकरच या कार्यक्रमाच्या शुटिंगला पुन्हा सुरूवात होणार आहे.
आता हे स्पर्धक आणि मेंटर्स नक्की कोण याची उत्सुकता तुम्हालाही असेलच, तर ते म्हणजे अभिनेता अभिजीत केळकर, अभिनेत्री पौर्णिमा डे, गायक रोहित राऊत, गायिका जुईली जोगळेकर आणि वादक निलेश परब अशी या पाच जणांची नावं आहेत. १४ ऑगस्ट रोजी अभिजीत आणि रोहित यांनी स्वतःहून आपली कोरोना चाचणी करून घेतली होती. त्यानंतर हे दोघेही कोविड पॉझिटीव्ह असल्याचं निष्पन्न झालं त्यानंतर बाकीच्या मंडळींनीदेखील आपापल्या कोरोना चाचण्या करून घेतल्या त्यात युनिटपैकी जुईली, पौर्णिमा आणि निलेश परब असे तीन जण कोरोना पॉझिटीव्ह असल्याचं निष्पन्न झालं. त्यांचे रिपोर्ट येण्यात आणखी दोन दिवस गेल्याने अखेर १६ ऑगस्ट रोजी कार्यक्रमाचं शुटिंग पूर्णपणे बंद करण्यात आलं.
यातील पाचही जण १४ दिवस डॉक्टरांच्या देखरेखीखाली गृहविलगीकरणात राहिले. त्यानंतर ते पूर्णपणे कोरोना मुक्त असल्याचं निष्पन्न झालं. नुकताच गायक रोहित राऊत याने स्वतः त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून एक व्हिडिओ शेअर करून याबाबत सुरू असलेल्या अनेक अफवांना पूर्णविराम देण्याचा प्रयत्न केला. ‘सिंगिंग स्टार’मधील पाचही जण आता सुखरूप असून लवकरच या कार्यक्रमाचं शुटिंग पुन्हा सुरू होणार असल्याचं त्याने सांगितलं. त्यामुळे ‘सिंगिंग स्टार’ या कार्यक्रमाला बसलेला कोरोनाचा फास अखेर सुटला आहे असंच म्हणावं लागेल. यावेळी कार्यक्रमाचे निर्माते प्रतिक कोल्हे यांच्यासह वाहिनीचे कार्यकारी निर्माते यांनी खूपच सांभाळून घेतल्याबद्दल त्याने वाहिनीचे आभार मानले.
या कार्यक्रमाच्या शुटिंगला लॉकडाऊन मध्येच सुरूवात झाल्याने त्याचे काही एपिसोड ‘सोनी मराठी’ वाहिनीकडे बँकिंगमध्ये आहेत. त्यामुळे स्पर्धक आणि मेंटर्सना कोरोना झाल्याचं निष्पन्न झाल्यानंतर शुटिंग थांबवावं लागलं असलं तरिही, प्रत्यक्ष प्रक्षेपणावर याचा काहीही परिणाम होणार नसल्याचं वाहिनीतील सूत्रांनी स्पष्ट केलं आहे. त्यामुळे लवकरच नवीन जोमाने ‘सिंगिंग स्टार’ या कार्यक्रमाच्या शुटिंगला सुरूवात होईल अशी आशा बाळगायला काही हरकत नाही.