मुंबई - झी मराठीवरील ‘अग्गबाई सूनबाई’ मालिकेला प्रेक्षकांचा उदंड प्रतिसाद लाभला. कथेत अनेक वळण आल्यानंतर आता ‘सूनबाई’ वरून ‘सासूबाई’वर फोकस वळला आहे. त्यातच ‘सूनबाई’ शुभ्राची भूमिका करणाऱ्या तेजश्री प्रधानच्या जागी आता उमा पेंढारकरची वर्णी लागली आहे. मालिकेत शुभ्राला तिचा पती धोका देत असल्याने तिची मानसिक कुचंबणा होत आहे. आता शुभ्राच्या आयुष्यात एक नवी व्यक्ती येणार असून त्यासाठी अभिनेता चिन्मय उदगीरकरची एन्ट्री झाली आहे. याआधी चिन्मय झी मराठीवरील 'नांदा सौख्यभरे’ या मालिकेतून प्रेक्षकांसमोर आला होता.
या मालिकेत आसावरीने घराची सूत्रे हाती घेतली आहेत, सोहम तिचा राईट हॅन्ड आहे. अभिजीत राजेंनी घराची जबाबदारी स्विकारली आहे. मालिकेत शुभ्राचे रूप खूप वेगळे आहे. ही शुभ्रा थोडी बुजरी आहे. ती एका मुलाची आई असून तिला मुलाची काळजी आहे. मी करते ते बरोबर आहे की नाही? हा भाव सतत तिच्या मनात असतो. मुलाच्या म्हणजेच बबडूच्या जन्माच्यावेळेस निर्माण झालेली गुंतागुंत आणि सोहम सोबत संसार टिकवण्यासाठीची तिची धडपड सुरू आहे.
कथेतील येणाऱ्या निरनिराळ्या वळणांमुळे या मालिकेला प्रेक्षकांचा भरघोस प्रतिसाद मिळत आहे. ‘अग्गबाई सूनबाई’ मालिकेत लग्नाच्या वाढदिवशी सोहम आणि सुझेनचं प्रेमप्रकरण शुभ्रा समोर आले. या प्रकरणाचा शुभ्राला मोठा धक्का बसल्याने ती आत्महत्या करण्याचा निर्णय घेते. त्याचवेळेस तिच्यासमोर अनुराग गोखले नावाची व्यक्ती येते. नक्की कोण आहे हा अनुराग? आणि त्याचे शुभ्राच्या आयुष्यात काय स्थान असणार आहे हे लवकरच प्रेक्षकांसमोर येणार आहे. ‘अग्गबाई सूनबाई’ झी मराठीवर सोमवार ते शुक्रवार रात्री ८.३० वाजता प्रसारित होते