‘कोहोक’ म्हणजेच ‘कोण होणार करोडपती' हा ज्ञानाचा खेळ असून कुठल्याही स्तरातील व्यक्तीला करोडपती होण्यास संधी आहे. तसेच सामान्यातला सामान्य माणूस या खेळात भाग घेऊ शकतो आणि विजयी होऊ शकतो. तसेच प्रेक्षकांचा हुरूप वाढविण्यासाठी आणि सामाजिक बांधिलकीबद्दल जागरूकता पसरविण्यासाठी दर आठवड्याला ‘कर्मवीर विशेष’ भाग प्रसारित केला जातो. यात सामाजिक कार्यांत मशगूल असणाऱ्या आणि अन्य नामांकित व्यक्तींना ‘कोहोक’ खेळण्यासाठी निमंत्रण दिले जाते जेणेकरून ते करीत असलेल्या सामाजिक कार्याला आर्थिक पाठबळ मिळू शकेल.
'कोण होणार करोडपती'मध्ये गेल्या आठवड्यात कर्मवीर विशेष भागात पद्मश्री नाना पाटेकर हॉटसीटवर आले होते. त्यांनी एकूण २५ लाख एवढी रक्कम जिंकून रंगकलामंच कलाकारांना दिली. या आठवड्यात २४ जुलैच्या कर्मवीर विशेष भागात ज्यांना भारतीय कोलंबस म्हटलं जातं असे कॅप्टन दिलीप दोंदे आणि त्यांच्याबरोबर अवलिया अभिनेता जितेंद्र जोशी हे येणार आहेत. हॉटसीटवर कॅप्टन दोंदे यांनी आपल्या सागर परिक्रमेचे अनेक रोमांचक किस्से सांगितले. जितेंद्रनेही आपली एक कविता या वेळी वाचून दाखवली. गप्पा, कविता, ज्ञान आणि समाजाला आपण काहीतरी देण्याची जाण, या सगळ्यांमुळे हा कर्मवीर विशेष भाग फार छान जमून आला आहे.
कॅप्टन दोंदे हे रिटायर्ड नेव्ही ऑफिसर आहेत आणि ते पहिले भारतीय आहेत ज्यांनी समुद्रातून विश्वभ्रमंती केली आहे. त्यांच्या सागर परिक्रमा या प्रकल्पांतर्गत स्वतः बोट बनवून त्यांनी एकट्याने ही सफर केली आहे. अभिनेता जितेंद्र जोशी हा एक उत्तम नट, कवी आणि लेखकही आहे. समाजाची जाण असलेला हा कलाकार 'कोण होणार करोडपती'च्या मंचावर खेळणार आहे.
कर्मवीरच्या भागामध्ये स्पर्धक येऊन सामाजातल्या गरजू घटकांसाठी खेळतात व जिंकलेली रक्कम त्यांना मदत म्हणून देऊ करतात. आता कॅप्टन दोंदे आणि जितेंद्र जोशी नेमकं कोणासाठी खेळणार, हे मात्र अजून गुलदस्त्यात आहे. घरबसल्या लखपती होण्याची संधी सोनी मराठी वाहिनी आपल्या प्रेक्षकांसाठी घेऊन आली आहे. 'कोण होणार करोडपती' टीव्हीवर पाहता-पाहता प्रेक्षक खेळू शकतात 'कोण होणार करोडपती - प्ले अलॉंग'! आणि जिंकू शकतात एक लाख रुपये आणि हॉटसीटवर येण्याची संधी.
'कोण होणार करोडपती चा ‘कर्मवीर विशेष' भाग २४ जुलै रोजी प्रसारित होणार आहे.
हेही वाचा - शिल्पा शेट्टीची होऊ शकते चौकशी, कुंद्रांच्या ऑफिसवर छापा, इलेक्ट्रॉनिक गॅझेट जप्त