मुंबई - आयुष्मान खुरानाचा 'बधाई हो' चित्रपट प्रेक्षकांच्या चांगलाच पसंतीस उतरला होता. अल्प बजेट असलेल्या या चित्रपटाने बॉक्स ऑफिवर अनेक चित्रपटांचे विक्रम मोडले. आता दिग्दर्शक बोनी कपूर यांनी या चित्रपटाचे हक्क विकत घेतले आहेत. या चित्रपटाचा दाक्षिणात्य भाषेत रिमेक करण्याचा निर्णय त्यांनी घेतला आहे.
एका माध्यमाशी बोलताना बोनी कपूर यांनी 'बधाई हो' चित्रपटाचा तमिळ, तेलुगू, कन्नड आणि मल्याळम या भाषेत रिमेक तयार करण्यात येणार असल्याचे सांगितले आहे. हिंदी व्हर्जनप्रमाणेच दाक्षिणात्य सिनेसृष्टीतही या चित्रपटाला चांगला प्रतिसाद मिळेल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
बोनी कपूर हे अमिताभ बच्चन आणि तापसी पन्नु यांच्या 'पिंक' चित्रपटाचाही दाक्षिणात्य भाषेत रिमेक तयार करणार आहेत.
'बधाई हो' चित्रपटात आयुष्मान खुरानासोबत 'दंगल गर्ल' सान्या मल्होत्रा मुख्य भूमिकेत झळकली होती. हा चित्रपट आयुष्मानच्या करिअरमधला सर्वाधिक कमाई करणारा चित्रपट ठरला होता.