सौरभ गंगल आणि अनुष्का गुप्ता हे ‘सांगीतिक’ भाऊ बहीण असून संगीत त्यांचा श्वास आहे. नुकतेच त्यांनी ‘कोई खता’ हे गंभीर-रोमँटिक गाणे रिलीज केले. त्या गाण्याला पाच दिवसातच २३+ लाख व्ह्यूज मिळाले आणि दिवसागणिक त्याची संख्या झपाट्याने वाढते आहे. महत्वाचं म्हणजे यावर्षीचं त्यांचं हे तिसरं गाणं असून आधीची दोन्ही गाणी सुद्धा हिट ठरली होती. या वर्षाच्या सुरूवातीस रिलीज झालेली त्यांची इतर दोन गाणी, नैनो की शरारत आणि मेरे सोहने सोनेया, यांनी आधीच जगभरातील कोट्यावधी श्रोत्यांना मंत्रमुग्ध केले आहे आणि आता हे तिसरे युगलपट आहे तेही सुपरहिट असल्याचे सिद्ध होत आहे. या प्रेमामुळे सौरभ आणि अनुष्का भारावून गेले आहेत.
‘कोई खता’ हे गाणे गाण्याबरोबरच याचे शब्दही या भाऊ-बहीण जोडीच्या लेखणीतून उतरले आहेत. हे गाणे झी म्युझिकने प्रदर्शित केले असून त्याला प्रचंड प्रतिसाद मिळत आहे. या गाण्याच्या व्हिडिओत हँडसम विन राणा आणि सुस्वरूप कांची कौल ही जोडी असून त्यांच्या अभिनयाने गाण्याला वेगळीच उंची दिली आहे. नैनो की शरारत, मेरे सोहने सोनेया आणि कोई खता या तिन्ही गाण्यांना संगीत दिले आहे अभिषेक गुप्ता यांनी आणि तिन्ही म्युझिक व्हिडीओज ची निर्मिती केली आहे ‘बिग नॉइज’च्या बॅनरखाली निर्माते कुमार बुपी यांनी.
सौरभ गंगल म्हणाला, ‘मला लहानपणापासूनच संगीताची आवड आहे. माझ्या गुरूंनी नेहमी मेहनतीवर भर द्यायला सांगितलं आणि आता त्या मेहनतीचे फळ मिळत आहे याचा आनंद आहे.’ २२ वर्षीय अनुष्का गुप्ताने संगीत विषय घेऊन पदवी घेतली आहे. तिची आवडती गायिका आहे श्रेया घोषाल आणि तिच्या पावलावर पाऊल टाकत तिला तिचा सांगितिक प्रवास करायचा आहे. या संगीतमय बहीण-भावासाठी संगीत ही जीवनवाहिनी आहे. नुकत्याच कोविड आजारातून सावरलेल्या सौरभला त्याबरोबर दोन हात करण्याची ऊर्जा संगीतानेच दिली असे तो सांगतो.
अनुष्का गुप्ता आणि सौरभ गंगल, या दोघांचीही देवावर श्रद्धा आहे आणि आपल्या यशाचे श्रेय ते देवालाच देतात. लवकरच त्यांच्या सुरेल आवाजात ते अजून एक ‘सिंगल’ घेऊन येणार आहेत.
हेही वाचा - HBD अशोक सराफ : रंगभूमीवरचा 'विदुषक' बनला चित्रपटसृष्टीचा 'मामा'!!