मुंबई - दिग्दर्शक अनुभव सिन्हा हे सामाजिक विषयांवर आधारित असलेल्या चित्रपटांसाठी ओळखले जातात. 'पिंक', 'मुल्क' आणि 'आर्टिकल १५' यांसारख्या चित्रपटातून त्यांनी विविध सामाजिक मुद्द्यांवर प्रकाश टाकला. मागच्या वर्षी प्रदर्शित झालेल्या 'आर्टिकल १५' मध्ये आयुष्मान खुराना मुख्य भूमिकेत होता. आता पुन्हा एकदा आयुष्मानला घेऊन ते आगामी चित्रपटाच्या तयारीला लागले आहेत.
'अनेक' असे त्यांच्या आगामी चित्रपटाचे नाव आहे. या चित्रपटात आयुष्मान खुरानाची मुख्य भूमिका पाहायला मिळणार आहे. हा चित्रपट राजकारणावर आधारित राहणार आहे. चित्रपट समीक्षक राजीव मसंद यांनी याबद्दलची माहिती दिली आहे. एप्रिल महिन्यात या चित्रपटाच्या शूटिंगला सुरुवात होणार आहे.
हेही वाचा -'कुली नंबर वन'चे शूटिंग पूर्ण, वरुण धवनने 'असं' केलं सेलिब्रेशन
वर्कफ्रंटबाबत सांगायचं तर, आयुष्मानचा 'शुभ मंगल ज्यादा सावधान' हा चित्रपट सिनेमागृहात दाखल झाला आहे. या चित्रपटाला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळताना दिसत आहे. समलैंगिक व्यक्तींच्या प्रेमकथेवर आधारित हा चित्रपट आहे. जितेंद्र कुमारने त्याच्यासोबत भूमिका साकारली आहे. तसेच गजराज राव आणि नीना गुप्ता यांचीही महत्त्वपूर्ण भूमिका या चित्रपटात आहे.
दुसरीकडे अनुभव सिन्हा यांच्या दिग्दर्शनाखाली तयार झालेला 'थप्पड' हा चित्रपटही प्रदर्शनाच्या वाटेवर आहे. यामध्ये अभिनेत्री तापसी पन्नु मुख्य भूमिकेत आहे. महिलांवर होणाऱ्या घरगुती अत्याचाराशी संबधीत हा चित्रपट आहे.
हेही वाचा -शिल्पा शेट्टीच्या घरी ७ वर्षानंतर पुन्हा पाळणा हलला, गोड परीचे आगमन
आता आयुष्मानसोबत तयार होत असलेल्या 'अनेक' चित्रपटाविषयी देखील उत्सुकता निर्माण झाली आहे.