मुंबई - बॉलिवूड अभिनेत्री कंगना रनौत आणि वाद हे जणू एक समीकरणच झाले आहे. काही वर्षांपूर्वी कंगना आणि आदित्य पांचोली यांच्यातील वादाने तोंड वर काढले होते. कंगनाने आदित्य यांच्यावर शिवीगाळ व मारहाणीचे आरोप लावले होते. यावर आदित्य यांनी कंगनाला उत्तर देताना तिच्या विरोधात तक्रार दाखल केली होती. आता कंगना आणि तिची बहीण रंगोली चंडैल यांच्या विरोधात अंधेरी कोर्टाने समन्स जारी केल्यानंतर शुक्रवारी (२६ जुलै) अंधेरी न्यायालयात यावर सुनावणी झाली.
कंगनाचे वकील रिजवाण सिद्दीकी यांच्याकडून न्यायालयात बाजू मांडताना असे सांगण्यात आले, की कंगना आणि तिच्या बहिणीला अद्याप कुठलेही समन्स न मिळाल्याने ते कोर्टात येऊ शकले नाही. यावर समन्स हे पोलिसांकडून बजाविले जाणार असल्याचे आदित्य पंचोलीच्या वकिलांनी कोर्टात सांगितले आहे. आता या प्रकरणी येत्या २२ ऑगस्ट रोजी सुनावणी होणार आहे.
याला अनुसरून आदित्य पंचोली आणि जरीना वहाब यांच्याकडून मुंबईतील अंधेरी कोर्टात दाखल याचिकेवर झालेल्या सुनावनी दरम्यान अंधेरी कोर्टाने कंगना विरोधात २ आणि रंगोली विरोधातही २ समन्स (आदित्य पंचोली व त्याची पत्नी जरीना वहाब कडून प्रत्येकी एक) असे ४ समन्स अंधेरी कोर्टाने काढले होते.