मुंबई - निस्सिम भक्ती पाहून देव पावतो असं म्हटलं जातं. हाच गाभा घेत एक नवीन मालिका प्रेक्षकांच्या भेटीला आली आहे, ‘वैदेही – शतजन्माचे आपुले नाते'. देव दिखाव्याला नाही श्रद्धेला पावतो, असं सांगणार्या या मालिकेत वैदेही ही रामाची निस्सिम भक्त आहे. तिच्या चांगल्या स्वभावामुळे ती दुसऱ्यांना नेहमी मदत करत असते. सालस आणि समंजस स्वभावाची वैदेही आपल्या कुटुंबासाठी, आपल्या बहिणींसाठी नेहमी खंबीर उभी राहते आणि आपल्या कुटुंबाची जबाबदारी सांभाळतेय.
वैदेहीची व्यक्तिरेखा सायली देवधर साकारते आहे. वैदेहीचं फुलांचं दुकान जिथे आहे, त्याच देवळात साहिल येत असतो. साहिल अंध आहे. पण, त्याला कोणाकडून मदत घ्यायला आवडत नाही. वैदेही आणि साहिल यांची आधीची ओळख आहे, असं प्रेक्षकांना पहिल्या भागात पाहायला मिळालं. आता या दोघांच्या मैत्रीचं रूपांतर प्रेमात होईल का, हे पाहणं प्रेक्षकांसाठी उत्सुकतेचं असणार आहे.
साहिल ही व्यक्तिरेखा अभिनेता अभिषेक रहाळकर साकारतोय. ही व्यक्तिरेखा साकारण्यासाठी त्यांनी नाशिकच्या नॅब संस्थेला भेट दिली आणि त्यांच्याकडून बऱ्याच गोष्टी जाणून घेतल्या आणि आपल्या व्यक्तिरेखेचा अभ्यास केला आहे. अंध व्यक्तिरेखा साकारण्यासाठी अभिषेकने घेतलेली मेहनत आणि अभ्यास या मालिकेत पाहायला मिळतोय. मराठी मालिका विश्वात अशी आगळीवेगळी प्रेमकहाणी प्रेक्षकांना पहिल्यांदाच बघायला मिळत आहे. डोळस वैदेही आणि अंध साहिल यांची प्रेमकहाणी 'वैदेही' - शतजन्माचे आपुले नाते ही मालिका 16 ऑगस्टपासून सोम ते शनि संध्या 7:30 वाजता प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे.
सायली देवधर हा मराठी टेलिव्हिजन इंडस्ट्रीवरील लोकप्रिय चेहरा आहे. 'लेक माझी लाडकी', 'जुळून येती रेशीमगाठी' सारख्या मालिकांमध्ये काम केले आहे. वर्ष 2020 मध्ये गायक-संगीतकार गौरव बुरसे याच्याशी सायलीनं लग्नगाठ बांधली आहे.