मुंबई - नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणूकीत अनेक नवे चेहरे आहेत. यात काही अभिनेत्रींचाही समावेश आहे. पश्चिम बंगालमधून तृणमुल काँग्रेसच्या वतीने निवडणूक जिंकलेल्या अभिनेत्री मिमी चक्रवर्ती व नुसरत जहां सध्या जोरदार चर्चेत आहेत. त्यांनी खासदार झाल्यानंतर दाखवलेला उत्साह सध्या चर्चेचा विषय ठरलाय.
नवनिर्वाचित खासदार मिमी चक्रवर्ती आणि नुसरत जहां यांनी एक टीकटॉक व्हिडिओ शेअर केलाय. यात त्या एका इंग्लिश गाण्यावर थिरकताना दिसतात. दोघींनीही काळ्या रंगाचे वस्त्रे परिधान केली असून त्या ग्लॅमरस अंदाजात नाचताना दिसतात. हा व्हिडिओ दिग्दर्शक राम गोपाल वर्मा यांनी शेअर केलाय. त्यांनी दिलेले कॅप्शन फारच उपरोधीक आहे. रामू यांनी लिहिलंय, ''व्वाव, या आहेत बंगालच्या नव्या खासदार....मिमि चक्रवर्ती आणि नुसरत जहां. भारत खरंच चांगली प्रगती करीत आहे. खासदारांचे हे चित्र डोळ्यांना सुखावणारे दिलासादायक आणि स्वागतार्ह आहे.''
या टीकटॉकवरुन दोघीही बऱ्याच ट्रोल झालेल्या दिसतात. संसदेत हेच करणार का अशी विचारणा काही जण करताहेत.
इतक्यावरच या दोघींचे प्रताप थांबलेले नाहीत. संसदेच्या बाहेर त्यांनी काढलेले सेल्फी आणि वेगवेगळ्या पोजमधील फोटो त्यांनी शेअर केले होते. हेदेखील युजर्सना पचलेले नाही. ही फोटो काढायची जागा नाही. इथून देश चालवला जातो अशी टीका त्यांच्यावर होऊ लागली आहे.
बंगाली सुप्रसिद्ध अभिनेत्री मिमी चक्रवर्ती आणि नुसरत जहां या पश्चिम बंगालमधून खासदार म्हणून निवडून आल्या आहेत. या दोघीही तृणमूल काँग्रेस पक्षाच्या आहेत. संसदेच्या पहिल्या दिवशी त्यांनी संसदेच्या बाहेर उभं राहून फोटो काढला आहे.या फोटोवरून त्यांची थट्टा उडवली जात आहे.संसदेच्या सभासद म्हणून त्यांनी योग्य वेशभूषा केलेली नाही असंही म्हटलं जात आहे.
बशिरहाट भागाच्या खासदार नुसरत जहां यांनी असाच एक फोटो शेअर केला आहे.त्यांना अनेक टीकांचा सामना करावा लागतोय. एका नागरिकाने बंगाली भाषेत लिहिले आहे की,”ही फोटो काढण्याची जागा नाही. इथे तुम्ही नागरिकांच्या हक्कांसाठी लढले पाहिजे. इथून देश चालवला जातो. ही तुमची योग्य जागा नाही.” काहींनी नुसरत यांनी फोटोसोबत लिहिलेल्या ओळींमधील व्याकरणाच्या चुका काढल्या आहेत.