अमरावती - 'गोव्याच्या किनाऱ्यावर' या गाण्यातील कलावंत सुहृद वार्डेकरच्या लग्नाची वरात नवी मुंबईच्या नेरूळ येथून थेट अमरावतीत पोहोचली आहे. अमरावतीकर प्राची खडतकर हिच्यासोबत सुहृद्ची लग्नगाठ बांधली जाणार आहे. अमरावतीच्या शेगाव जावरकर सभागृहात सुहृद आणि प्राचीचा लग्न सोहळा बुधवारी सकाळी आयोजित करण्यात आला आहे.
सुहृद वार्डेकरने 'असावा सुंदर स्वप्नांचा बंगला' यासह 'छोटी मालकिन' या मालिकांमधून भूमिका केल्या आहेत. अभिनेता असणाऱ्या नवरदेवाच्या सोबत विवेक सांगळे, संग्राम समेळ आणि अंकुश ठाकूर या कलावंतांची हजेरीही लक्षवेधी ठरणारी आहे. अमरावतीत धमाल मस्ती करण्याचा मूड लग्नात पाहुणे म्हणून आलेल्या कलावंतांचा आहे.
हेही वाचा - रजनीकांत यांनी फेटाळले 'मॅन व्हर्सेस वाईल्ड'वेळी अपघात झाल्याचे वृत्त
अमरावतीसोबत माझे जुने नाते आहे. आमचे खूप नातेवाईक अमरावतीत राहतात. मात्र, अमरावतीतील मुलीशी लग्नाचे नाते जुळेल अशी कधीही कल्पना केली नव्हती. आईने पुण्यात एका मुलीची भेट घेण्यास सांगितले. प्राचीची भेट घेतल्यानंतर पंधरा मिनिटातच मी तिच्याशी लग्न करायच ठरवलं. प्राचीनेही लगेच होकार कळवला, अशी प्रतिक्रिया सुहृदने दिली.
मी सुहृदचे काम पाहिले आहे. मात्र, त्यावेळी याच्याशी लग्न वगैरे होईल अशी कधीही कल्पना केली नव्हती, असे प्राचीने सांगितले. 14 फेब्रुवारीला सुहृदचा 'दाह' नावाचा सिनेमा येतो आहे. सिनेमा रिलीज होण्यापूर्वी लग्न सोहळा संपन्न होत आहे.
सुहृद आणि प्राचीच्या लग्नासाठी अमरावतीत आलेले विवेक सांगळे आणि संग्राम समेळ यांनी या लग्नात आम्ही धमाल मस्ती करणार आहोत, असे सांगितले. अमरावतीत आल्यावर येथील स्पेशल गिला वडा खाण्यात वेगळीच मजा आल्याचे संग्रामने सांगितले. या दोघां सोबतच मूळचा अमरावतीचा असणारा अंकुश ठाकूर हा अभिनेताही या लग्नसोहळ्यात सहभागी झाला आहे.