सेलिब्रिटीज आणि अफवा या हातात हात घालून चालत असतात. बऱ्याचदा या अफवांचा फिल्मी कलाकारांना त्रास होत असतो. परंतु पोलीस स्टेशन वा कोर्टाची पायरी चढावी लागू नये म्हणून त्यावर ॲक्शन घेत नाहीत. परंतु नवीन पिढीतील कलाकार असा विचार करीत नाहीत आणि पाणी डोक्यावरून जाण्याआधीच त्याची दखल घेत समोरच्याला धडा शिकवतात. आता फिल्म आणि टेलिव्हिजन ॲक्टर मोहित रैनाचे उदाहरण घ्या ना. सोशल मीडियावर त्याची चाहती म्हणवून घेणारी मुलगी आणि इतर तीन जणांविरोधात त्याने पोलिसांत तक्रार नोंदविली आहे. हे चौघे ‘मोहितच्या जीवाला धोका आहे’ असा संदेश सर्वांना पाठवत ‘#मोहितबचाओ’ असे कॅम्पेन समाज माध्यमांवर चालवत होते.
मोहित रैना ‘देवों के देव महादेव’ मधील प्रमुख भूमिकेमुळे प्रकाशझोतात आला. त्याच्या सुंदर चेहऱ्याने व ‘सिक्स-पॅक्स’ बॉडीने अनेकांना वेड लावले तसेच त्याने आपल्या अभिनयाने आपला चाहतावर्ग तयार केला. समाज माध्यमांवर मोहित रैना फॅन्स क्लब सक्रिय असून ते मोहितबद्दलची माहिती त्याच्या इतर चाहत्यांपर्यंत पोहोचवत असतात. मोहित रैना याने, नुकत्याच अभिनेत्री यामी गौतम सोबत लग्नबंधनात अडकलेल्या, दिग्दर्शक आदित्य धरच्या ‘उरीः द सर्जिकल स्ट्राइक’ या चित्रपटातही महत्वपूर्ण भूमिका निभावली होती.
मोहित रैनाची स्वयंघोषित हितचिंतक सारा शर्मा आणि तिचे मित्र परवीन शर्मा, आशिव शर्मा, आणि मिथिलेश तिवारी यांच्याविरुध्द आयपीसी कलम ३८४ अंतर्गत मुंबईच्या गोरेगाव पोलिस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे. दिवंगत अभिनेता सुशांतसिंग राजपूतप्रमाणेच मोहितचे आयुष्य संकटात आहे, असे सांगत पोलिसांनी चौघेही अफवा पसरवत असल्याचं एएनआयने सांगितलं आहे.
या चौघांविरूद्ध गुन्हेगारी कट रचणे, पोलिसांना खोटी माहिती देणे, धमकी देणे आणि खंडणीची मागणी केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
हेही वाचा - या पावसात अभिनेत्री रुपाली भोसलेला खुणावतोय तिच्या बाल्कनीतला मोगरा!