गेल्या वर्षीपासून जवळपास सर्वच सण घरात बसूनच साजरे करावे लागले होते. यावर्षीदेखील तीच वेळ आली असून कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा कहर संपतानाच तिसरी लाट येण्याची आशंका व्यक्त होत आहे. महाराष्ट्रासह देशभरात कोरोनामुळे अनेक प्रतिबंध लावण्यात आले, त्यामुळे गेल्यावर्षी आणि यावर्षीदेखील महाराष्ट्राला वारी अनुभवता आली नाही. पंढरपूरचा विठोबा हे महाराष्ट्राचे आराध्य दैवत. आषाढी एकादशीला महाराष्ट्रात वेगळे महत्त्व आहे.
आषाढी एकादशी म्हटले, की प्रथम डोळ्यांसमोर येते ती पंढरपूरची वारी. आषाढी एकादशीच्या निमित्ताने या आठवड्यात सर्व लिटिल चॅम्प्स विठुरायाच्या महिमा आपल्या गाण्यातून सादर करणार आहेत. या आठवड्यात हे स्पर्धक अभंग, ओव्या आणि भारूड गाऊन परीक्षक आणि प्रेक्षकांना मंत्रमुग्ध करतील. या विशेष भागाची सुरुवात प्रथमेश लघाटेच्या सुंदर अभंगाने होईल. इतकंच नव्हे तर या अभंगावर सर्व लिटिल चॅम्प्सची पंढरीची वारी प्रेक्षक बघू शकतील.
यावर्षी झी मराठीवरील 'सारेगमप लिटिल चॅम्प्स' मधील १४ टॅलेंटेड लिटिल चॅम्प्स त्यांच्या सुमधूर गाण्यांनी प्रेक्षकांना विठूमाऊलीच दर्शन घडवतील. आता या स्पर्धेत लिटिल चॅम्प्सना गोल्डन तिकीट मिळायला सुरुवात झाली असून अनेक लिटिल चॅम्प्सनी एक नव्हे तर दोन्ही आठवड्यात गोल्डन तिकिट्स मिळवली आहेत. या आठवड्यात गोल्डन तिकीट आणि 'परफॉर्मर ऑफ द वीक'चं टायटल कोण पटकवणार हे पाहण औस्त्युक्याचं ठरेल. त्यामुळे ‘सारेगमप लिटिल चॅम्प्स'मध्ये विठूनामाचा गजर ऐकायला मिळणार आहे.