पाऊस आणि रोमान्स हातात हात घालून चालतात. पडद्यावर ते बघताना अनेकांच्या अंगावर रोमांच उभे राहत असतात. परंतु तोच पाऊस कलाकारांना मात्र नकोस वाटतो. गाण्यामध्ये रोमॅन्स फुलवायचं काम करणारा पाऊस त्याचं गाण्याच्या शुटिंगच्या टिमला मात्र किती त्रासदायक ठरू शकतो, त्याचं उत्तम उदाहरण ठरलं, नादखुळा म्युझिकचं 'येड्यावानी करतंय' हे नुकतंच रिलीज झालेलं गाणं. निखील नमीत आणि प्रशांत नाकतीची निर्मिती असलेलं, अभिजीत दानी दिग्दर्शित, संजू राठोड आणि जी स्पार्क ह्यांनी संगीतबध्द केलेलं, संजू राठोड आणि सोनाली सोनावणेने गायलेलं 'येड्यावानी करतंय' हे गाणं श्रध्दा पवार आणि नील चव्हाणवर चित्रीत झालंय.
- " class="align-text-top noRightClick twitterSection" data="">
निर्माते निखील नमीत आणि प्रशांत नाकती म्हणतात, “नादखुळा म्युझिक सुरू करताना नव्या टॅलेंटला व्यासपीठ देण्याचा आमचा संकल्प होता. संजू राठोड ह्या जळगावच्या टॅलेंटेड संगीतकार, गायकाला आम्ही ह्या गाण्यातून संधी दिलीय. अशाच नवनव्या कलाकारांना आपली क्षमता सिध्द करायची संधी नादखुळा म्युझिक सातत्याने देत राहिल.”
संजू राठोडने गाण्याचे बोल लिहीले आहेत. संगीत दिले आणि हे गाणे गायलेही आहे. गीतकार, संगीतकार, गायक संजू राठोड म्हणाला, “माझी आत्तापर्यंतची सर्व गाणी ही शहरी बाजाची होती. गावरान बाजाचं एखादं गाणं करावं अशी इच्छा होती. आणि हे बोल सुचले. गाणं तयार झाल्यावर एकदा प्रशांतदादाला ऐकवलं. त्याला ते एवढं आवडलं की, प्रशांतदादा आणि निखीलदादाने लगेच निर्मिती करायचं ठरवलं. शुटिंगपूर्वी हे मुलाच्याच अँगलचे गाणे होते. पण शुटिंग दरम्यान त्यात मुलीच्या भावनाही प्रकट झाल्या पाहिजेत, हे लक्षात आल्याने लगेच गाण्यात बदल केले आणि सोनाली सोनावणेला अप्रोच केला.”
या गाण्याचं चित्रीकरण इगतपुरी जवळच्या एका गावात केलं गेलंय. पहिल्या प्रेमावरचं गावरान गाणं असल्याने हिरव्याकंच शेतामध्ये पावसाळ्यात हे गाणं चित्रीत करायचं ठरलं, पण पावसानेच शुटिंगमध्ये खोळंबा केला आणि ३६ तास ब्रेक न घेता टिमला हे गाणं शुट करावं लागलं. ह्याविषयी दिग्दर्शक अभिजीत दानी म्हणतात,”नवोदित कलाकारांची टिम असल्याने रिटेक झाले तर, असं म्हणून शुटिंग वेळेत पूर्ण करण्यासाठी सकाळी चारची शिफ्ट लावली. पण जणु पावसाने आमची परिक्षाच घ्यायचं ठरवलं होतं. पावसाने त्यादिवशी उसंतच घेतली नाही. मग उघड्या रानात शुटिंग पूर्ण करताना आमचे नाकीनऊ आले. अख्खा दिवस अख्खी रात्र जागून आणि दुस-या दिवशीही असं करून ३६ तासात गाणं पूर्ण केलं. ह्यात आमच्या युवा कलाकारांचा जोश कामी आला. आणि आता ही येड्यावानी केलेली मेहनत फळाला आलेली आहे.”
अभिनेता नील चव्हाणचे हे पहिलेच गाणे आहे. नील म्हणतो, “माझ्या पहिल्या सीनच्या वेळी मी खूपच नर्व्हस होतो. शुटिंग पाहायला खूप गर्दी झाली होती. मी हिरोईनला पाहून शेताच्या बांधावरून पळत चाललेला असतो असा सीन होता. तेव्हा खूप पाऊस पडत होता. शेतीच्या बांधावर खूप चिखल झाला होता. त्यामुळे घसरून पडायची शक्यता होती. पण न घसरता चेह-यावर हसरे एक्सप्रेशन घेऊन पळत जायचे होते. हा माझा सगळ्यात अवघड सीन होता. अनेक अडचणींना सामोरे जाऊन आम्ही गाणे पूर्ण केले आणि आता हे गाणे रिलीज होते आहे. ह्याचा आम्हांला आनंद होतो आहे.”
गायिका सोनाली सोनावणेने गायलेलं गाणं श्रध्दा पवारवर चित्रीत झालंय. श्रध्दा आणि सोनालीचं हे एकत्र पाचवं गाणं आहे. सोनाली सोनावणे म्हणते, “माझा आवाज श्रध्दावर ऑनस्क्रीन चांगला सूट होतो असं मला वाटतं. ह्या प्रोफेशनल जर्नीमधून मला श्रध्दा ही एक बेस्ट फ्रेंड मिळाली. मी गायलेल्या गाण्यावर जेव्हा ती ॲक्टिंग करते, तेव्हा मला खूप आनंद होतो. श्रध्दाच्या चेह-यातली निरागसता ह्या गाण्यातून उत्तमरितीने झळकलीय. संजू राठोडसाठी मी ह्याअगोदरही तीन गाणी गायली आहेत. हे गाणं संजू ने ऐकवताच मला ते खूप आवडलं होतं. आत्तापर्यंत संजूने संगीतबध्द केलेल्या सर्व गाण्यांमधलं माझं हे सर्वात आवडतं गाणं आहे. संजूच्या गाण्याची खासियत आहे की त्याची गाणी ही युवा पिढीला खूप रिलेटेबेल असतात.”
श्रध्दा पवारची सोशल मीडियावर चांगलीच फॉलोविंग आहे. श्रध्दा म्हणते, “येड्यावानी करतंय हे गाणं माझ्यासाठी खूप खास होतं. एक तर, हे माझं पहिलं गाणं, त्यात प्रचंड पावसात शुटिंग करताना चेह-यावर रोमँटिक भाव द्यायचे, हे अवघडच काम होतं. इन्स्टाग्राम इन्फ्लुएन्सर म्हणुन मोबाईल कॅमेरा फेस करणं आणि शुटिंगचा कॅमेरा फेस करणं ह्या दोन वेगळ्या गोष्टी असतात. मला अभिनेत्री म्हणून करीयर सुरू करण्याचा कॉन्फिडन्स ह्या गाण्याने दिला.”
नादखुळा म्युझिक प्रस्तुत 'येड्यावानी करतंय' हे गावरान बाजाचं रोमँटिक गाणं नुकतंच रिलीज झालंय.
हेही वाचा - जबरदस्त मराठी थ्रिलर 'ग्रे'चा ट्रेलर लॉन्च, वैभव तत्ववादीची थक्क करणारी अॅक्शन