संगीत हा भारतीयांच्या जीवनातील अविभाज्य भाग आहे. त्यातच महाराष्ट्रीयन संगीतप्रेमींना नाट्यसंगीताची विशेष आवड आहे. चित्रपट आणि नाटक ही दोन वेगळी माध्यमं, चित्रपट त्यातील गाणी आपल्याला ऐकण्यासाठी सर्वत्र उपलब्ध असतात, पण नाटक हे रसिकांना नाट्यगृहात जाऊन पाहावं लागतं. अनेकवेळा नाटकासाठी खास काही गाणी बनवली जातात ती लोकप्रिय होतात, पण नाटकाचे प्रयोग बंद पडल्यानंतर क्वचितच ती रसिकांना ऐकण्यासाठी उपलब्ध होतात. त्यामुळेच नाटकातील काही गाणी व्हिडीओ स्वरूपात आणण्याचा एक नवीन प्रयोग मधुसूदन कुलकर्णी आणि श्रीनिवास कुलकर्णी यांनी केला आहे.
"सुख दुःख सारी" हे एक नाटकातील गाणं सुप्रसिद्ध गायिका आनंदी जोशीच्या आवाजात स्वरबद्ध झाले असून ते अक्षय संत यांनी शब्दबद्ध केले आहे. या गाण्याला स्वप्निल सावंत आणि जीवन मराठे यांनी संगीतबद्ध केलेले असून याची अरेंजमेंट सत्यजित केळकर यांनी केली आहे. हे त्यातलच एक गाणं प्रदर्शित झालं असून नाटकातील गाणे असल्यामुळे या गाण्याची लांबी जेमतेम सव्वा मिनिट आहे. या गाण्यातून सुप्रसिद्ध निर्माती पूनम शेंडे आणि बालकलाकार सारा पालेकर प्रथमच अभिनेत्री म्हणून पदार्पण करत आहेत. आई आणि मुलीची फ्रेश जोडी प्रेक्षकांना पहायला मिळणार आहे.
याबद्दल बोलताना दिग्दर्शक योगेश तवार म्हणाले की, "एक ते सव्वा मिनिट लांबीच्या गाण्यात स्टोरी दाखवणं हे एक आव्हान होतं पण टीमने ते अतिशय सुरेख पद्धतीने चित्रित करण्यात यश मिळवलं आणि एक छोटीशी सुंदर पटकथा चित्रित केली. ‘सुख दुःख सारी’ या गाण्याचा प्रवास खूप मजेदार होता आणि मला खात्री आहे की प्रेक्षकांनाही हे गाणं नक्की आवडेल''.
हेही वाचा - पुण्यातील युवकांनी रस्त्यांवर येऊन ‘मनी हाईस्ट' स्टाईलने लस घेण्याचं केले आवाहन!