मुंबई - छत्रपती शिवाजी महाराजकालीन चित्रपट व मालिकांना मराठी प्रेक्षक भरघोस पाठिंबा देत असतात. जिजामातांच्या कार्यकर्तृत्वावर आधारलेली 'स्वराज्यजननी जिजामाता' ही मालिका सध्या सोनी मराठीवर प्रसारित होत असून ही मालिका प्रेक्षकांची मनं जिंकण्यात यशस्वी झाली आहे. तसेच या मालिकेची दखल अनेक पुरस्कार सोहळ्यांत घेतली गेली आहे. आता त्यात अजून एका मानाच्या पुरस्कारची भर पडली आहे. मटा सन्मान २०२१ च्या सोहळ्यात मालिका विभागात 'स्वराज्यजननी जिजामाता' मालिकेने ५ पारितोषिकांवर आपली मोहोर उमटवली आहे.
'स्वराज्यजननी जिजामाता' मालिकेने ५ पारितोषिकांवर उमटवली मोहोर! छत्रपती शिवाजी महाराजांच्या 'आऊसाहेब' केवळ ही एक ओळख म्हणजे जिजामाता नव्हे तर जिजामातांचा संघर्ष. त्यांच्या संस्कारातून घडलेले शिवबा आणि स्वराज्याच्या जडणघडणीकरीता रोवलेल्या मुहूर्तमेढीचा सुवर्ण इतिहास या एका नावात दडला आहे. अभिनेते-खासदार अमोल कोल्हे, सोनाली घनश्याम राव आणि विलास मनोहर सावंत यांनी जगदंब क्रिएशन्सच्या बॅनरद्वारा निर्मिलेल्या 'स्वराजजननी जिजामाता' मालिकेला पारितोषिकांद्वारा केलेला मानाचा मुजरा म्हणजे प्रेक्षकांनी दिलेल्या उदंड प्रेमाची पोचपावतीच म्हणायला हवी. 'स्वराज्यजननी जिजामाता' मालिकेने मटा सन्मान सोहळ्यात 'सर्वोत्कृष्ट मालिका', 'सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक' - हेमंत देवधर, 'सर्वोत्कृष्ट अभिनेत्री' - अमृता पवार, 'फ्रेश फेस ऑफ द इयर' - अमृता पवार हा विशेष पुरस्कार तर 'सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेता - प्रदीप कोथमिरे अशा तब्ब्ल ५ पारितोषिकांवर आपलं नाव कोरलं आहे. कोरोनाच्या कठीण काळात देखील आमच्या टीमला आणखी जोमाने काम करण्याची उर्मी दिली, त्याबद्दल मालिकेच्या निर्मात्यांनी मटा सन्मान आयोजकांचे आणि परीक्षकांचे आभार मानले आहेत.'स्वराज्यजननी जिजामाता' ही मालिका सोनी मराठी वाहिनीवर प्रसारित होते.
हेही वाचा - ६७वे राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार : 'छिछोरे' सर्वोत्कृष्ट हिंदी चित्रपट; तर मराठीमध्ये 'बार्डो'ची बाजी