हैदराबाद - तेलंगाणा सरकारने अडीच महिन्यांनंतर राज्यातील चित्रपट आणि टीव्ही शुटिंगचे नियम शिथिल केले आहेत. त्यानंतर रामोजी फिल्म सिटीमध्ये चित्रपटाच्या शूटिंगचे काम वेगाने सुरू झाले आहे.
ईटीव्हीवर प्रसारित होणारी प्रसिद्ध ‘सीथमम्मा वाकिटलो सिरिमले चेट्टू’ या मालिकेचे शुटिंग पुन्हा सुरू झाले आहे. शूटिंग दरम्यान, केवळ निवडलेल्या कलाकारांना त्या ठिकाणी येण्याची परवानगी देण्यात आली आहे. तसेच सर्व तंत्रज्ञ सुरक्षिततेच्या सूचनांचे पूर्णपणे पालन करीत आहेत. सेट ही वेळोवेळी स्वच्छ केला जात आहे. नियमितपणे, सेटवरील लोकांची तपासणी केली जात आहे. तसेच सुरक्षित सामाजिक वावराचे नियम पाळूनच चित्रीकरण पूर्ण केलं जात आहे.
तेलगू सिनेस्टार चिरंजीवी, एस.एस. राजामौली आणि नागार्जुन आदींनी आंध्र प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांची भेट घेतली होती. त्यानंतर तिथेही राज्यात चित्रपटाच्या चित्रीकरणाला परवानगी दिली आहे. आगामी काळात संजय गुप्ता दिग्दर्शित ‘मुंबई सागा’ या क्राईम थ्रिलरची शूटिंगही आरएफसीमध्ये होणार आहे. 1980 आणि 1990 च्या दशकावर आधारित या गँगस्टर ड्रामा चित्रपटात जॉन अब्राहम, सुनील शेट्टी, इमरान हाश्मी आणि गुलशन ग्रोव्हर मुख्य भूमिकेत दिसणार आहेत.